चिपळूण/रत्नागिरी
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण विधानसभा मतदारसंघाने भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल मतदार यादी पुनरिक्षण अर्थात SIR अभियानात राज्यात ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. 265-चिपळूण विधानसभा मतदारसंघाने मतदार यादी पुनरिक्षणाचे शंभर टक्के काम पूर्ण करत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपविभागीय अधिकारी तथा मतदान नोंदणी अधिकारी आकाश लिगाडे यांच्या नेतृत्वाखाली ही उल्लेखनीय कामगिरी साध्य झाली. चिपळूण विधानसभा मतदारसंघातील 336 मतदान केंद्रांवरील सुमारे 2 लाख 71 हजार मतदारांच्या नोंदींचे पुनरिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले आहे.
मतदार यादी अधिक अचूक आणि त्रुटीमुक्त करण्याच्या उद्देशाने आता 8 ऑगस्टपर्यंत फेरपडताळणी, अनमॅप मतदारांचे मॅपिंग तसेच उर्वरित त्रुटी दूर करण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या उल्लेखनीय यशामुळे चिपळूण विधानसभा मतदारसंघाने राज्यभरात आदर्श निर्माण केला असून, निवडणूक आयोगाच्या या महत्त्वपूर्ण अभियानात रत्नागिरी जिल्ह्याच्या कार्यक्षमतेचीही दखल घेतली जात आहे.












