खेरशेतमध्ये उद्या वर्षावास धम्मसंस्कार

विविध विषयांवरील व्याख्यानांतून विचारांचा होणार जागर; वैचारिक मंथनाची पर्वणी

चिपळूण (प्रतिनिधी) : धम्मविचार, सामाजिक प्रबोधन आणि वैचारिक जागृतीच्या माध्यमातून समाजाला सकारात्मक दिशा देण्याच्या उद्देशाने चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समिती सावर्डे विभाग आणि खेरशेत शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. ४ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजता खेरशेत येथील तक्षशिला बुद्ध विहार येथे वर्षावास धम्मसंस्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात विविध विषयांवर व्याख्यानांच्या माध्यमातून विचारांचा जागर केला जाणार आहे. उपस्थितांना वैचारिक मंथनाची अनुभूती मिळणार आहे.
धम्म, सामाजिक बांधिलकी, प्रबोधन आणि जीवनमूल्ये यांचा व्यापक संदर्भ उलगडणाऱ्या मार्गदर्शनातून उपस्थितांच्या विचारविश्वाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून केला जाणार आहे. कार्यक्रमात धम्म ध्वजारोहण, दीपप्रज्वलन व पुष्पहार अर्पण झाल्यानंतर बौद्ध उपासक आयु. सुभाष सावंत यांच्याकडून धम्मसंस्कार, तर आयु. विजय कदम, आयु. शरद कदम व आयु. अनिल कदम यांच्याकडून उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात येणार आहे. आयु. संतोष पवार हे प्रास्ताविक करतील. संस्थेचे मुंबई मुख्य कमिटी अध्यक्ष आयु. विठोबादादा पवार, सरचिटणीस, आयु. हरिश्चंद्र पवार, स्थानिक कमिटी अध्यक्ष आयु. चंद्रकांत सावंत आणि आयु. शरद कदम यांच्या मार्गदर्शनातून विविध विषयांची वैचारिक मांडणी होणार आहे. धम्म मार्गदर्शन आयु. रोहित जाधव करणार असून, अध्यक्षीय भाषण आयु. काशीराम कदम गुरुजी यांचे होणार आहे. कार्यक्रमाचा समारोप व आभार आयु. मिलिंद कदम मानणार आहेत. या निमित्ताने धम्मसंस्कारासोबतच विचारांचे आदान-प्रदान, प्रबोधनाचा जागर घडणार असल्याने परिसरातील बौद्ध बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.