वैभववाडी येथे ६ सप्टेंबर रोजी कवी संमेलनाचे आयोजन
वैभववाडी l प्रतिनिधी : वैभववाडी तालुक्यातील सांस्कृतिक व साहित्यिक चळवळीला बळ मिळावे, या उद्देशाने गेल्या वर्षी अक्षरवैभव साहित्य संस्कृती मंचाची स्थापना करण्यात आली. या मंचाच्या वतीने वैभववाडीचे सुपुत्र तथा ज्येष्ठ कवी कविवर्य नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘श्रावणसरी’ कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे कविसंमेलन ६ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता बाबासाहेब आंबेडकर स्मारक व सांस्कृतिक भवन, वैभववाडी येथे होणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी कवयित्री प्रमिता तांबे यांची निवड करण्यात आली आहे.
या कविसंमेलनाचे उद्घाटन आनंदीबाई रावराणे महाविद्यालय, वैभववाडीचे प्राचार्य डॉ. के. आर. चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वैभववाडीचे पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर उपस्थित राहणार आहेत.
कविवर्य नारायण सुर्वे हे वैभववाडी तालुक्यातील हेत गावचे सुपुत्र असून, त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या साहित्यिक योगदानाचे स्मरण व्हावे, तसेच नवोदित व स्थानिक कवी-कवयित्रींना व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने या कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या काव्यसंमेलनाचे स्वरूप खुले ठेवण्यात आले असून, सहभागी कवी-कवयित्रींना आपल्या आवडीची एक स्वरचित कविता सादर करता येणार आहे. नोंदणी करणाऱ्या पहिल्या ३० कवी-कवयित्रींना कविता सादरीकरणाची संधी मिळणार असून, सहभागी सर्व कवी-कवयित्रींना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
काव्य, साहित्य आणि संस्कृतीच्या माध्यमातून तालुक्यातील साहित्यिकांना एकत्र आणणाऱ्या या उपक्रमात जास्तीत जास्त कवी-कवयित्री तसेच साहित्यप्रेमींनी सहभागी व्हावे, असे आवाहन अक्षरवैभव साहित्य संस्कृती मंचचे अध्यक्ष प्रा. एस. एन. पाटील व सचिव चेतन बोडेकर यांनी केले आहे.













