आडाळी एमआयडीसीत २५० कोटींची गुंतवणूक; ऑटोमेज कंपनीचा नवा प्रकल्प

५०० हून अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार : आ. दीपक केसरकर यांचा पुढाकार

सावंतवाडी । प्रतिनिधी :सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील आडाळी औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) क्षेत्रात आणखी एका मोठ्या उद्योगाचा समावेश होणार असून २५० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून एक नवीन कारखाना साकारला जाणार आहे. यासंदर्भातील माहिती आमदार दीपक केसरकर यांनी दिली.

या प्रकल्पाबाबत १ सप्टेंबर रोजी मुंबईत एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ऑटोमेज कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर अतीन अग्रवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) रवींद्र रणसिंग आणि आमदार दीपक केसरकर उपस्थित होते. या बैठकीदरम्यान ऑटोमेज कंपनीच्या वतीने आडाळी एमआयडीसीमध्ये कारखाना उभारण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला.

आमदार दीपक केसरकर यांच्या विशेष प्रयत्नांमुळे हा २५० कोटी रुपयांचा प्रकल्प आडाळी येथे येत आहे. या नवीन कारखान्यामुळे स्थानिक पातळीवर मोठी रोजगार निर्मिती होणार असून ५०० हून अधिक तरुणांना नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

ऑटोमेज ही ऑटोमोबाईल व उत्पादन क्षेत्रातील एक नामांकित कंपनी आहे.

सध्या या कंपनीचे भारतामध्ये विविध ठिकाणी पाच कारखाने यशस्वीरीत्या सुरू असून परदेशातही एक कारखाना कार्यरत आहे. आता आडाळी एमआयडीसीत होणाऱ्या या नव्या प्रकल्पामुळे कोकणातील औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे.