पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांची संकल्पना
रत्नागिरी:
गुन्ह्यांच्या तपासाची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि पूर्वीच्या प्रकरणांमधील त्रुटींची पुनरावृत्ती टाळण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या संकल्पनेतून ‘अधिनिर्णय अॅप’ हे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित नाविन्यपूर्ण डिजिटल व्यासपीठ विकसित करण्यात आले आहे. हे अॅप रत्नागिरी पोलीस दलासाठी योग्य तपासाची दिशा ठरवण्यात प्रभावी मार्गदर्शक ठरत आहे.
या अॅपच्या माध्यमातून न्यायालयात दोषसिद्ध झालेल्या तसेच निर्दोष मुक्तता झालेल्या प्रकरणांचे सखोल विश्लेषण केले जाते. तपासातील त्रुटी, पुराव्यांमधील कमतरता आणि निकालावर परिणाम करणाऱ्या मुद्द्यांचा अभ्यास AI तंत्रज्ञानाद्वारे केला जातो, ज्यामुळे समान स्वरूपाच्या पुढील गुन्ह्यांमध्ये त्या चुका टाळणे शक्य होते. या अॅपमध्ये मागील ५ वर्षांतील न्यायालयीन निकाल लागलेल्या प्रकरणांचे विश्लेषण समाविष्ट करण्यात आले असून पुढील प्रकरणांची नोंदही नियमित ठेवली जाणार आहे.
अधिनिर्णय अॅपचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ‘One-Page Case Summary’. प्रकरणाची पार्श्वभूमी, तपासाची कार्यवाही, उपलब्ध पुरावे, निकाल आणि महत्त्वाच्या त्रुटी एकाच पानावर संक्षिप्त स्वरूपात उपलब्ध होतात. यामुळे पोलीस अधिकारी व अंमलदारांचा वेळ वाचून तपासाचे नियोजन जलद व सुटसुटीत होत आहे.
दैनंदिन हजेरीवेळी मार्गदर्शन
पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी दैनंदिन हजेरीच्या वेळी या अॅपमधील विश्लेषित प्रकरणांचे वाचन करत असून, न्यायालयीन निरीक्षणे आणि कार्यपद्धतीबाबत प्रत्यक्ष तपास पथकाला मार्गदर्शन करत आहेत. “मागील तपासातून शिकवण व AI आधारित विश्लेषणातून भविष्यातील तपासात सुधारणा” या उद्देशामुळे तपासाची गुणवत्ता उंचावून न्यायालयात दोषसिद्धीचे प्रमाण (Conviction Rate) वाढण्यास मोठी मदत होणार आहे.













