कांदळवन संवर्धनासाठी केलेल्या कार्याची कायम स्मरणात राहणारे ; वयाच्या ४८व्या वर्षी मुंबईत घेतला अखेरचा श्वास
देवगड : तिर्लॉट आंबेरी गावचे सुपुत्र, सामाजिक कार्यकर्ते तसेच कांदळवन (मँग्रोव्ह) संवर्धनासाठी कार्यरत असलेले रामचंद्र उर्फ रामजी शामराव भाबल (वय ४८) यांचे १ सप्टेंबर २०२६ रोजी मुंबई येथील रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या अकस्मात निधनाने तिर्लॉट आंबेरीसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
रामजी भाबल यांनी सामाजिक कार्याबरोबरच पर्यावरण संवर्धनासाठी सातत्याने योगदान दिले. विशेषतः कांदळवनांचे संरक्षण व संवर्धन यासाठी त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय होते. समाजातील विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत त्यांनी आपली सामाजिक बांधिलकी जपली. त्यांच्या जाण्याने समाजकार्यातील एक अभ्यासू, ध्येयवादी आणि समर्पित कार्यकर्ता हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुलगे असा परिवार आहे. भाबल कुटुंबावर या दुःखद घटनेने मोठा आघात झाला असून नातेवाईक, मित्रपरिवार तसेच सामाजिक आणि पर्यावरण क्षेत्रातील कार्यकर्त्यांकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे.
पर्यावरण संवर्धन आणि समाजकार्यासाठी रामजी भाबल यांनी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील. त्यांच्या निधनाने परिसराने एक समर्पित समाजसेवक आणि पर्यावरणप्रेमी कार्यकर्ता गमावला आहे.













