आनंदयात्री वाङ्मय मंडळ वेंगुर्ला आयोजित “घन ओथंबून येती” कवी संमेलन उत्साहात…
वेंगुर्ले : दाजी नाईक
कविता वाचकाच्या मनावर मोठा परिणाम करते. मग ती कवीच्या मनावर किती परिणाम करत असेल?कवितेच्या कधी कधी दोनच ओळी सुचतात व पुढे अनेक दिवस काहीच सूचत नाही. असे झालच तर ती ओढून ताणून लिहिण्यापेक्षा तिच्या नैसर्गिक उर्मीने सहजतेनेच तिला येऊ द्यावे. कविता स्वतःच्या नजरेतून प्रथम तावून सुलाखून निघालेली असावी. दर्जा राखण्यासाठी परत परत वाचून रंग रंगोटी करून संस्करण करणे गरजेचे असते. कविता ही मुद्दामहून लिहायची म्हणून येत नसते. ती आतून उत्स्फूर्तपणे आली पाहिजे ती नैसर्गिक रित्या जशी येते तशीच तिला येऊ द्यावी असे प्रतिपादन डाॅक्टर दर्शना कोलते यानी केले.
आनंदयात्री वाङ्मय मंडळ वेंगुर्ला आयोजित “घन ओथंबून येती” या कवी संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर सुप्रसिद्ध कवी सुधाकर ठाकूर व कवी अजित राऊळ होते. अवधूत नाईक यानी प्रास्ताविक केले. आनंदयात्री च्या अध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिका वृंदा कांबळी यानी मान्यवरांचा परिचय करून दिला. वृंदा कांबळी यांच्या हस्ते डाॅक्टर दर्शना कोलते यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
घन ओथंबून येती या कविसंमेलनात कवितांच्या रचनेतील व आशियातील वैविध्य पाहाता आले. रसिकांना यातून चांगलाच काव्यानंद घेता आला. वासूदेव पेडणेकर यानी आपल्या मालवणी कवितेतून अवेळी पावसाने केलेल्या नुकसानीचे व निसर्गाचे सुरेख वर्णन केले. नंदकिशोर परब यानी मी माणूस आहे या कवितेत आजच्या विकासाच्या दिशेने जात असताना निसर्गाचा र्हास करून स्वतःचाच विनाश ओढवून घेणार्या माणसाचे उपरोधिक शब्दात वर्णन केले. योगेश कुलकर्णी यानी सृजन व समर्पण यांचा संयोग असणार्या पावसाचे वर्णन करताना ” प्राचीवरूनी मेघ अर्पित समर्पणाचा स्वर नजराणा , मातीवरूनी शिवरूनी जातो मांगल्याचा नवा उखाणा” असे वर्णन केले. हेमा सावंत यानी ‘अन् श्रावण दारी आला’ या आपल्या कवितेत पावसाच्या अनेक रूपातून प्रेमाच्या रितीने सादर करताना ” तुझ्या आठवतात सारा आषाढ वाहून गेला. तू दिसलीस जराशी अन् श्रावण दारी आला” अशा ओळीनी सुरूवात करून उपस्थितांची दाद मिळवली.
विशाल उगवेकर या गुणी कविनी भाद्रपद जवळ आला की घरातली म्हातारी माणसे मुंबईत असलेल्या मुलाची कशी वाट पाहातात त्यांच्या मनाची घालमेल व्यक्त करताना ” श्रावण संपत चललो. आता भाद्रपद इलो. तुझ्या वाटेकडे झाला जीव आमचो लागलो . ” अशा शब्दात सुरूवात केली. स्वप्निल वेंगुर्लेकर या गुणी कविने अशीच मोल या कवितेत पावसाची विविध रूपे वर्णन करताना, ” वाटतं असं पावसालाच गच्च मिठीत घ्यावं विरून जावं त्यात अन्य पाऊस होऊन जावं ” अशा शब्दात पावसाची ओढ व्यक्त केली. जान्हवी कांबळी यानी ‘पहिला पाऊस ‘ ही कविता गाऊन सादर केली. सिद्धी हरमलकर यानी शहरातला पाऊस व गावातला पाऊस यातील फरक अनेक उदाहरणानी वर्णन केला. प्रा. विवेक चव्हाण यानी आला श्रावण ही कविता स्वतःच्या चालीत गाऊन सादर केली. मेधा मणेरिकर यानी आई व मुलगी यांचा संवाद कवितेतून सुंदर रितीने सादर केला. अवधूत नाईक यानी ,’ पाऊस ‘ ही कविता सादर करताना, ” पाऊसच तो वेगवेगळ्या रूपातून यायचा.धर्तीच्या रोमारोमात भिनून बीजाच्या अंतरी शिरायचा ” अशा शब्दात वर्णन केले. प्राजक्ता करंगूटकर यानी ‘ कळी ‘ ही रूपकात्मक रचना सादर केली. दिनेश बिशनोई यानी एक प्रेमाची उत्कटता दर्शविणारे प्रेमकाव्य सादर केले. अजित राऊळ यानी आपली पाऊस ही कविता सादर केली. पि. के कुबल यानी पावसाची केलेली मनधरणी सांगणारी कविता वाचली. कवी सुधाकर ठाकूर यांच्या आगामी अल्बममधील स्वरबद्ध केलेली श्रावण आला ही कविता ऐकवून रसिकांना काव्यानंदाबरोबरच संगितानंदही दिला.
उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या कवी संमेलनात पावसाची विविध रूपे कवितांमधून पहाता आली. कवितांमधली पाऊस अनुभवताना रसिकांना व काव्यप्रेमीना चांगली काव्याची मेजवानी मिळाली.
काव्याच्या क्षेत्रात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे महत्वाचे योगदान आहे. काव्यासाठी सुपीक असलेल्या वेंगुर्ला या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मातीत काव्य लेखनाचे भरघोस पिक येत आहे.काव्याच्या क्षेत्रासाठी भविष्यातील आश्वासक चित्र या कवी संमेलनातून दिसून आले. अवधूत नाईक यानी आभार मानले. संजय पाटील यानी निवेदन केले.













