राज्य पतसंस्था फेडरेशनची वार्षिक सभा रत्नागिरीत उत्साहात संपन्न

पोटनियमात सुधारणांसह ठेव संरक्षणासाठी शासनाकडे भरीव योगदानाची मागणी
प्रत्येक संस्थेने दरमहा १० नवीन युवकांना जोडण्याचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांचे आवाहन

रत्नागिरी:
महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनची वार्षिक सर्वसाधारण सभा व दोन दिवसीय अभ्यासवर्ग रत्नागिरी येथे ॲड. दीपक पटवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडला. या महामेळाव्यात फेडरेशनच्या पोटनियमांत महत्त्वपूर्ण दुरुस्त्या मंजूर करण्यात आल्या, तसेच पतसंस्थांच्या ठेवींना संरक्षण मिळण्यासाठी शासनाने भरीव योगदान द्यावे, असा ठराव एकमुखाने मंजूर करण्यात आला.
सभेला मार्गदर्शन करताना अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी संस्थांनी अधिक विश्वासार्ह व शिस्तप्रिय कार्यपद्धती अवलंबण्याचे आवाहन केले. “पतसंस्था चळवळीत युवा पिढीचा सहभाग वाढवण्यासाठी प्रत्येक संस्थेने दरमहा किमान १० नवीन युवकांना संस्थेसोबत जोडण्याचा उपक्रम अग्रक्रमाने राबवावा,” असे आवाहन त्यांनी केले. तसेच पतसंस्थांच्या कामकाजाचे कायदेशीर दस्तऐवजीकरण (डॉक्युमेंटेशन) सुलभ व्हावे म्हणून अर्ज, करार व रोख्यांच्या आदर्श नमुन्यांची पुस्तिका आगामी दोन महिन्यांत प्रकाशित करण्यात येईल, अशी महत्त्वाची घोषणाही त्यांनी केली.

सभेत पारित झालेले महत्त्वाचे ठराव:
ठेव संरक्षण निधी: ठेव संरक्षणासाठी शासनाने भरीव आर्थिक योगदान द्यावे आणि जोपर्यंत प्रभावी यंत्रणा उभी राहत नाही, तोपर्यंत संस्थांवर अंशदान भरण्याची सक्ती करू नये.
क्रेडिट इन्स्टिट्यूट दर्जा: आरबीआयने (RBI) केंद्रीय कायद्यातील तरतुदींचा वापर करून पतसंस्थांना ‘क्रेडिट इन्स्टिट्यूशन’ म्हणून मान्यता द्यावी.
पतसंस्थांची वर्गवारी: वाढते व्यवहार लक्षात घेऊन संस्थांची श्रेणी ठरवून वर्गीकरण करावे व वाढीसाठी पूरक धोरण आखावे.
पोटनियम बदल: फेडरेशनचे वर्गीकरण ‘अन्य संस्था’ प्रकारात करण्यासह पोटनियमातील अनेक सुधारणांना मंजुरी.
अभ्यासवर्गाचे आयोजन:
या परिषदेत पतसंस्था प्रतिनिधींसाठी सर्वंकष अभ्यासवर्गाचे आयोजन करण्यात आले होते. याचे उद्घाटन जिल्हा उपनिबंधक राम कुलकर्णी यांनी केले. यावेळी जनता सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष अभय माटे यांनी ‘डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण (DPDP) कायदा’ यावर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. तसेच डॉ. सोपान शिंदे व सुहास पाटणकर यांनी विविध विषयांवर व्याख्याने दिली.
या सोहळ्यास फेडरेशनचे महासचिव राजोबा, उपाध्यक्ष डॉ. शिंगी, माजी अध्यक्ष काकासाहेब कोयटे, डॉ. भोसले, छाबडा, प्रा. आकरे, वाजे, तांबेकर, बांगर, मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. लवांदे, विभागीय फेडरेशनचे संतोष थेराडे, सिंधुदुर्ग पतसंस्थेचे अध्यक्ष राऊळ, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सचिन भिंगारडे, शिवकृपाचे अध्यक्ष गोरखनाथ चव्हाण, छत्रपती संभाजी महाराज पतसंस्थेचे अध्यक्ष लेंभे, राजापूर कुणबी पतसंस्थेचे अध्यक्ष मांडवकर आणि नागपूर जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष राजेंद्र घाटे यांच्यासह राज्यभरातून मोठ्या संख्येने प्रतिनिधी उपस्थित होते. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सहकार्याने पार पडलेल्या या सहकार महामेळाव्याचे संयोजन अत्यंत प्रभावी ठरले.