मुकुंदराव फाटक नर्सिंग कॉलेजमध्ये प्रथम वर्ष GNM विद्यार्थ्यांचा ‘लॅम्प लायटिंग व शपथविधी’ सोहळा उत्साहात संपन्न

परिचारिका ही आरोग्य व्यवस्थेचा मुख्य आधार असते. परिचारिकांनी रुग्णांची सेवा करताना चेहऱ्यावर हसू आणि आपुलकी ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. ज्यामुळे रुग्णाला जगण्याची नवी नवी उमेद देते. विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ओळखून अभ्यास आणि चांगल्या संगतीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा बुद्धांक उत्तम असून योग्य शैक्षणिक सुविधा मिळाल्यास भविष्यात सिंधुदुर्ग जिल्हा हा ‘एज्युकेशन हब’ बनेल, असे मत सुनीता शांताराम एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष तथा आमदार प्रमोद जठार यांनी येथे व्यक्त केले.

सुनीता शांताराम एज्युकेशन ट्रस्ट संचलित मुकुंदराव फाटक नर्सिंग कॉलेज, देवगड येथे प्रथम वर्ष जीएनएम नर्सिंग विद्यार्थ्यांचा ‘लॅम्प लायटिंग अॅण्ड ओथ टेकिंग सेरेमनी’ जामसंडे येथील सांस्कृतिक भवन येथे पार पडला. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर माजी आमदार अॅड. अजित गोगटे, सौ. निरजा जठार, डॉ. अनिल नेरुरकर, डॉ. मिलिंद काळे, डॉ. शिवप्रसाद, जयंत मणेरीकर, श्रावणी मदभावे, महादेव कानडे, महेश खोत, प्राचार्य प्रकाश ढाले, डॉ. रामदास बोरकर, डॉ. नम्रता बोरकर, शिडवणे सरपंच रवींद्र शेटये आदी उपस्थित होते.

डॉ. मिलिंद काळे म्हणाले, परिचारिकांनी आयुष्यभर उपयोगी पडणारे व्यावहारिक ज्ञान अंगी बाळगणे गरजेचे आहे. त्यांनी पुस्तकी ज्ञानासोबत प्रत्यक्ष रुग्णसेवेचे कौशल्य आत्मसात करावे. रुग्णाच्या व्यथा समजून घेऊन सहानुभूतीने सेवा करावी. वेळेचे पालन, प्रामाणिकपणा आणि चुकीची कबुली देण्याची हिंमत त्यांनी ठेवावी. यातच परिचारिकेच्या सेवेचे यश आहे. नर्सिंग कॉलेजमध्ये पाऊल ठेवताच विद्यार्थी मानवतेची निष्ठापूर्वक सेवा करण्याची मानसिकता तयार करतात. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना २४ तास आधाराची गरज असते, जी परिचारिका पूर्ण करतात. असे त्यांनी सांगितले.

डॉ. अनिल नेरुरकर म्हणाले, अमेरिकेसारख्या विकसित देशांमध्ये ५० ते ७० टक्के लोकसंख्या वयोवृद्ध असून तिथे कुशल नर्सेसची मोठी गरज आहे. त्यासाठी सोपे इंग्रजी भाषा कौशल्य आत्मसात करण्याची गरज आहे. केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नसून नर्सेससाठी मानसिक व शारीरिक आरोग्य अत्यंत गरजेचे आहे. वेळेवर झोप, योग्य आहार आणि नियमित व्यायाम (योग व मेडिटेशन) यावर भर दिला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी डॉ. शिवप्रसाद, अॅड. अजित गोगटे यांनी मनोगत व्यक्त केले. नर्सिंग क्षेत्रातील सेवाभाव, करुणा, शिस्त आणि रुग्णसेवेची जबाबदारी यांची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी नर्सिंग व्यवसायातील सेवा व कर्तव्याची शपथ घेत ज्ञानाचा दिवा प्रज्वलित केला. विद्यार्थ्यांना डॉ. नम्रता बोरकर यांनी शपथ दिली. प्रास्ताविक प्राचार्य प्रकाश ढाले यांनी केले. सूत्रसंचालन विद्यार्थिनी ईशा शिंदे यांनी केले. आभार शिक्षिका ऋतुजा नाईक यांनी केले.