शिवगंगा नदीपात्रातील १० किलो जैव वैद्यकीय कचरा संकलित
शिरगाव (प्रतिनिधी) :
देवगड तालुक्यातील शेवरे गावाच्या हद्दीतून वाहणाऱ्या पियाळी-शिवगंगा नदीच्या पात्रात अज्ञात व्यक्तींनी जैव वैद्यकीय कचरा टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या वापरासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या या नदीपात्रात धोकादायक कचरा आढळल्याने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले.
पियाळी-शिवगंगा नदी हा परिसरातील अनेक गावांसाठी महत्त्वाचा जलस्रोत आहे. पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या वापरासाठीही या नदीचे पाणी वापरले जाते. तसेच नदीमुळे आसपासच्या विहिरींना पाणी उपलब्ध होते. याशिवाय पाडगार येथील
देवगड प्रादेशिक नळयोजनाही याच नदीवर अवलंबून असल्याने नदीपात्रात जैव वैद्यकीय कचरा टाकण्याच्या प्रकाराचे गांभीर्य अधिक वाढले आहे.
शेवरे-महाळुंगे मार्गावरील पुलाजवळ इंजेक्शनच्या रिकाम्या बाटल्या, व्हाइल्स, डिस्पोजेबल सिरिंज आणि सुया पडलेल्या असल्याचे ग्रामस्थ मंदार साटम व रतिश साटम यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ याबाबतची माहिती शिरगावचे माजी सरपंच अमित साटम यांना दिली. माहिती मिळताच अमित साटम यांच्या पुढाकाराने आर. के. फाउंडेशनच्या युवा कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेत नदीपात्रात उतरून सुमारे १० किलो जैव वैद्यकीय कचरा संकलित केला. त्यानंतर हा कचरा योग्य विल्हेवाटीसाठी शिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राकडे सुपूर्द करण्यात आला.
या मोहिमेत अमित साटम यांच्यासह मंगेश पवार, युधिराज राणे, ओमकार तावडे, विघ्नेश माळवडे, राज माळवडे, कुशल साटम, कुमार अनभवणे, पार्थ तावडे आणि सोनू मोंडकर यांनी सक्रिय सहभाग घेतला. युवकांनी सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरणाबाबतची जागरूकता जपत केलेल्या या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
“ग्रामस्थांच्या जागरूकतेमुळे हा प्रकार उघडकीस आला. वाहत्या नदीपात्रात जैव वैद्यकीय कचरा टाकणे हा गंभीर गुन्हा असून मानवी आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी तसेच भविष्यात असे प्रकार घडू नयेत यासाठी प्रयत्न करण्यात येतील,” असे अमित साटम यांनी सांगितले.












