मतदार पुनरीक्षणासह शैक्षणिक गुणवत्तेची पाहणी

 

आडाळी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांकडून कौतुक

दोडामार्ग (सुहास देसाई) :

 

कोकण विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक रुबल अगरवाल यांनी ‘विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम २०२६’ अंतर्गत दोडामार्ग तालुक्यातील आडाळी येथील मतदान केंद्राला भेट देऊन सुरू असलेल्या कामकाजाची पाहणी केली. आडाळी येथील प्राथमिक शाळा क्रमांक १ मधील मतदान केंद्राच्या पाहणीसोबतच त्यांनी शाळेतील विविध उपक्रम व विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचाही आढावा घेतला. या वेळी विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि शाळेच्या उपक्रमांचे विभागीय आयुक्त रुबल अगरवाल व सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी विशेष कौतुक केले.

आडाळी प्राथमिक शाळा क्र. १ येथील मतदान केंद्रावरील मतदार यादी, उपलब्ध सुविधा आणि पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी विभागीय आयुक्तांनी केली. त्यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधून मतदार यादी अधिक अचूक व निर्दोष करण्याच्या दृष्टीने सूचना दिल्या.

या वेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी अस्खलित इंग्रजीतून विभागीय आयुक्त रुबल अगरवाल व जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. शाळेतील परिपाठ व विविध उपक्रमांची पाहणी करून जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले.

शाळेच्या मुख्याध्यापिका सायली देसाई व आडाळीचे सरपंच पराग गावकर यांनी शाळेच्या कामकाजाची सविस्तर माहिती दिली. या प्रसंगी अपर आयुक्त फरोग मुकादम, उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे, उपविभागीय अधिकारी वीरसिंह वसावे, तहसीलदार राहुल गुरव गटशिक्षणाधिकारी एन एम नदाफ आदी अधिकारी उपस्थित होते.