साळशी येथे गणपती सजावट व भजन सम्राट स्पर्धा

स्वर्गीय भाऊ गावकर घराणे, कसबा साळशी यांच्या वतीने आयोजन

शिरगाव (प्रतिनिधी) :         देवगड तालुक्यातील साळशी येथील स्वर्गीय भाऊ गावकर घराणे, कसबा साळशी यांच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त गाव मर्यादित सुंदर घरगुती गणपती सजावट व भजन सम्राट स्पर्धेचे दुसरे पर्व आयोजित करण्यात आले आहे.

गणेशोत्सवातील उत्साहाला कलात्मक व सांस्कृतिक उपक्रमांची जोड देतानाच गावातील युवकाना व नागरिकांना आपल्या कलागुणांना वाव देण्याची संधी या स्पर्धांच्या माध्यमातून मिळणार आहे.

गणपती सजावट स्पर्धेतून सर्जनशीलतेला प्रोत्साहन मिळणार असून, भजन सम्राट स्पर्धेतून पारंपरिक भजन संस्कृती व स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळणार आहे.

या दोन्ही स्पर्धांतील विजेत्यांसाठी समान बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. प्रथम क्रमांकास ५,५५५ रुपये रोख व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांकास ३,३३३ रुपये रोख व आकर्षक चषक, तर तृतीय क्रमांकास २,२२२ रुपये रोख व आकर्षक चषक देण्यात येणार आहेत.

या सांस्कृतिक उपक्रमाला सामाजिक बांधिलकीची जोड देत साळशी प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मंडळाच्या वतीने मोफत शालेय बॅगचे वाटप करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत मिळावी आणि त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

इच्छुक स्पर्धकांनी आपली नावे १२ सप्टेंबरपर्यंत रोहन लाडगावकर (७७१०९०९१९१) किंवा राहुल लाडगावकर (८२७५४३०६८४) यांच्याशी संपर्क साधून नोंदवावीत, असे आयोजकांकडून कळविण्यात आले आहे.

हा उपक्रम वरळी पोलीस कॅम्प उत्सव मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजेश विजय लाड व भूषण सदानंद गावकर यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत आहे.