दोडामार्ग: सुहास देसाई
तालुक्यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील व मोठ्या साटेली-भेडशी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सुमन गणपत डिंगणेकर यांच्याविरोधातील अविश्वास ठरावाला अखेर विशेष ग्रामसभेत ग्रामस्थांनीही कौल दिला आहे. शुक्रवारी पार पडलेल्या गुप्त मतदान प्रक्रियेत अविश्वास ठरावाच्या बाजूने १७७ मते पडल्याने उपसरपंच सुमन डिंगणेकर यांना पदावरून पायउतार व्हावे लागले आहे.
साटेली-भेडशी ग्रामपंचायतीच्या सरपंच छाया सखाराम धर्णे यांच्यासह आठ सदस्यांनी उपसरपंचांवर अविश्वास ठराव दाखल केला होता. २४ ऑगस्ट रोजी तहसीलदार राहुल गुरव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या विशेष सभेत सर्व ८ सदस्यांनी ठरावाच्या बाजूने मतदान केल्याने तो बहुमताने मंजूर झाला होता. मात्र, प्रक्रियेचा पुढील टप्पा म्हणून आयोजित विशेष ग्रामसभेत ग्रामस्थांचा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार होता.
दोडामार्ग तहसीलदार राहुल गुरव व गटविकास अधिकारी अजिंक्य सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यासी अधिकारी तथा सहायक गटविकास अधिकारी यशवंत भिवा गवस आणि सचिव ज्योती डोंगरदिवे यांच्या उपस्थितीत ही विशेष ग्रामसभा पार पडली. यावेळी बॅलेट पेपरद्वारे मतदान प्रक्रिया राबवण्यात आली.
एकूण ३८३ ग्रामस्थांनी मतदानाचा हक्क बजावला. यात अविश्वास ठरावाच्या बाजूने १७७ मते
ठरावाच्या विरोधात:७५ मते
बाद झालेली मते:१३१ मते मिळाली साटेली भेडशी या पार्श्वभूमीवर कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी ग्रामपंचायत परिसरात कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
तालुक्यातील सर्वात मोठी
अकरा सदस्य संख्या असलेल्या साटेली-भेडशी ग्रामपंचायतीच्या इतिहासात उपसरपंचांवर अविश्वास ठराव मंजूर होण्याची ही पहिलीच वेळ आहे. या निकालाने तालुक्यातील राजकीय वातावरणात मोठ्या चर्चेला उधाण आले आहे.
सरपंच सौ छाया धरणे यांनी
“सहकारी सदस्यांनी मांडलेल्या अविश्वास ठरावाला ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आणि ठरावाच्या बाजूने मतदान करून पाठिंबा दिला. जनतेच्या कोर्टातही आम्ही जिंकलो असून हा कौल आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आगामी काळात ग्रामस्थांना सोबत घेऊन गावचा विकास अधिक प्रभावीपणे करू,” अशी प्रतिक्रिया सरपंच छाया धर्णे यांनी दिली.













