दोडामार्ग एसटी आगाराच्या समस्यांवर भाजपा आक्रमक; जिल्हा नियंत्रक दीपक गोडे यांना निवेदन देऊन विविध मागण्यांवर चर्चा

दोडामार्ग: प्रतिनिधी

 

दोडामार्ग तालुक्यातील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या (एसटी) विस्कळीत सेवेमुळे आणि बसस्थानकातील अपुऱ्या सुविधांमुळे प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या वतीने एसटी महामंडळाचे जिल्हा नियंत्रक दीपक गोडे यांच्याशी संपर्क साधून त्यांना दोडामार्ग येथे निमंत्रित करण्यात आले. या भेटीदरम्यान महामंडळाच्या विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

चर्चेदरम्यान भाजपा पदाधिकाऱ्यांनी दोडामार्ग एसटी आगाराशी संबंधित खालील महत्त्वाच्या नियंत्रकांसमोर मांडल्या यामध्ये

बस स्टँडवर नियंत्रकाची नियुक्ती करावी व दोडामार्ग बसस्थानकावर गाड्यांच्या वेळापत्रकाचे नियोजन करण्यासाठी आणि प्रवाशांच्या सोयीसाठी कायमस्वरूपी वाहतूक नियंत्रक (कंट्रोलर) नेमावा.

SMC कार्डसाठी अतिरिक्त मशीन: प्रवाशांची गर्दी लक्षात घेता SMC (स्मार्ट कार्ड/ई-टिकेटिंग) साठी अजून एका मशीनची तातडीने सोय करण्यात यावी.

आगामी श्री गणेशोत्सवात प्रवाशांची मोठी रहदारी असते. त्यामुळे गाड्यांमध्ये बिघाड झाल्यास तातडीने दुरुस्ती करण्यासाठी दोडामार्ग येथे विशेष मेकॅनिकल टीम उपलब्ध ठेवावी.

कर्मचाऱ्यांचे सौजन्यपूर्ण वर्तन: एसटी कर्मचाऱ्यांनी प्रवाशांशी नम्रतेने व सौजन्याने बोलावे आणि सहकार्य करावे, अशा सूचना कर्मचाऱ्यांना देण्यात याव्यात.

स्थानक व स्वच्छतागृहाची दुरुस्ती: दोडामार्ग बसस्थानकाची दुरवस्था झाली असून बसस्टँड इमारत तसेच स्वच्छतागृहाची (टॉयलेट) लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावी.

या सर्व समस्या आणि मागण्या ऐकून घेतल्यानंतर जिल्हा नियंत्रक दीपक गोडे यांनी या सर्व विषयांची गांभीर्याने दखल घेतली असून, मांडलेल्या मागण्या आणि दुरुस्तीची कामे लवकरात लवकर पूर्ण केली जातील, असे सकारात्मक आश्वासन दिले.

यावेळी भारतीय जनता पार्टीचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.