बागायतदार त्रस्त, लाखो रुपयांचे नुकसान
दोडामार्ग l प्रतिनिधी :तालुक्यातील झोळंबे परिसरात मागील काही दिवसांपासून लाल तोंडाच्या माकडांच्या टोळ्यांनी थैमान घातले आहे. यामुळे नारळ बागायतदार शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. लाखो रुपयांचे नारळ वाया गेले आहेत. तालुक्यातील बहुतांशी गावात हीच परिस्थिती आहे. माकडांचा बंदोबस्त करण्याची मागणी शिवसेना तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांनी वनविभागाकडे केली आहे.
दोडामार्ग तालुक्यातील शेतकऱ्यांचे नारळ हे उत्पन्नाचे मुख्य साधन आहे. परंतु लाल तोंडाच्या माकडांमुळे त्यांच्या उपजीविकेवर गदा आली आहे. गेल्या काही वर्षात माकडांची संख्या वाढल्याने ती आता थेट बागायतींवर हल्ला करत आहेत. झाडांवर चढून कच्चे आणि पिकलेले नारळ पाडून टाकत आहेत. ज्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत.
आम्ही वर्षभर मेहनत करून नारळाचे पीक घेतो. परंतु माकडांमुळे ते वाया जात आहे. रोज सकाळी बागेत आल्यावर नारळांचा ढिग खाली पडलेला दिसतो. लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. वनविभाग मात्र काहीच कार्यवाही करत नाही, अशी उद्विग्न प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली.
माकडांच्या उपद्रवामुळे शेतकरी हतबल झाले असून वनविभागाकडे तातडीने माकडांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. तसेच झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून योग्य ती भरपाई देण्याची मागणीही त्यांनी लावून धरली आहे. वनविभागाने यावर तातडीने लक्ष घालून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अन्यथा भविष्यात नारळ बागायतदार आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता आहे.
———













