‘आई-वडील जन्म देतात; पण त्या जन्माला दिशा देणारा शिक्षकच!’

शिवाजी इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहात; विद्यार्थ्यांनी व्यक्त केला गुरुजनांप्रती कृतज्ञतेचा भाव

कुडाळ :

वेताळ बांबर्डे विभाग शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शिवाजी इंग्लिश स्कूल व दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय, पणदूर तिठा येथील गुरुवर्य कैलासवासी शशिकांत अनावकर सर विद्यानगरीमध्ये ४ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थी व विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेत गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

 

शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना शिक्षकांच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित केले. “शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देणे खूप सोपे असते; मात्र शिक्षकांचे जगणे आणि त्यांच्यावरील जबाबदारी समजून घेणे कठीण असते,” असे विद्यार्थ्यांनी सांगितले.

 

वर्गात विविध स्वभावाची ४०-५० मुले असताना प्रत्येकाचे भविष्य घडविण्याची जबाबदारी शिक्षकांवर असते. कोणी हुशार, कोणी खोडकर, कोणी शांत तर कोणी बिनधास्त असते. चुकीवर ओरडले तर शिक्षक कठोर वाटतात, तर प्रेमाने समजावले तर शिक्षक कमजोर समजले जातात. गुण कमी पडले तर शिकवण कमी पडल्याचे म्हटले जाते आणि गुण चांगले आले तर त्याचे श्रेय विद्यार्थ्यांना मिळते. मात्र या सर्व परिस्थितीतही शिक्षक विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी सातत्याने प्रयत्नशील राहतात, अशी भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

 

“आई-वडील जन्म देतात; पण त्या जन्माला दिशा देणारा शिक्षकच असतो. शिक्षक केवळ धडा शिकवत नाही, तर तो माणूस घडवतो. माणूस घडविणाऱ्या शिक्षकाची किंमत मार्कशीटवर कधीच लिहिता येत नाही,” असे विद्यार्थ्यांनी सांगितले.

 

तसेच, आज शिक्षक दिनानिमित्त फोटो काढून स्टेटस ठेवणारे अनेक असतील; मात्र आयुष्यभर शिक्षकांना लक्षात ठेवणारे मोजकेच असतात. “ज्या शिक्षकांनी ‘तू हे करू शकतोस’ असा आत्मविश्वास दिला, त्यांना केवळ शिक्षक दिनी नव्हे, तर आयुष्यभर सलाम असायला हवा,” अशा शब्दांत विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

 

विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या या भावपूर्ण प्रतिक्रियांमुळे शिक्षक दिनाचा कार्यक्रम अधिक अर्थपूर्ण ठरला. गुरुजनांच्या मार्गदर्शनातून संस्कारक्षम, आत्मविश्वासू आणि जबाबदार नागरिक घडविण्याचा संदेश या निमित्ताने देण्यात आला.