१ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त शिक्षक-शिक्षकेतरांचा रत्नागिरीत मूक मोर्चा; जुनी पेन्शन न मिळाल्यास आमरण उपोषणाचा इशारा

रत्नागिरी:
१ नोव्हेंबर २००५ पूर्वी सेवेत रुजू झालेल्या मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी शिक्षक दिनाचे औचित्य साधून रत्नागिरीत भव्य मूक मोर्चा काढण्यात आला. मराठा भवन, माळनाका येथून निघालेल्या या मोर्चाचा समारोप जिल्हाधिकारी कार्यालयावर झाला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
राज्यातील सुमारे २६ हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी २००५ पूर्वी नियुक्त असून नैसर्गिक न्यायानुसार ते जुन्या पेन्शनसाठी पात्र आहेत, याकडे निवेदनात लक्ष वेधण्यात आले. वरिष्ठ वेतन श्रेणी, निवड श्रेणी आणि सेवाज्येष्ठतेसाठी नियुक्ती दिनांक ग्राह्य धरला जातो, त्याच तत्त्वावर पेन्शनसाठीही मूळ नियुक्ती दिनांकच ग्राह्य धरावा, अशी आग्रही मागणी आंदोलकांनी केली.
निवृत्तांवर भाजी विकण्याची वेळ; इच्छामरणाची मागणी
सुरुवातीच्या काळात ८ ते १० वर्षे विनावेतन काम केलेल्या या संवर्गातील सुमारे ८ हजार कर्मचारी आतापर्यंत सेवानिवृत्त झाले आहेत. मात्र, गेल्या १० ते १२ वर्षांपासून त्यांना पेन्शन मिळत नसल्याने त्यांचे हाल होत आहेत. उदरनिर्वाहासाठी निवृत्त शिक्षकांना भाजी विकणे, हॉटेलमध्ये काम करणे अथवा गवंडी काम करावे लागत असून, ही सरकारसाठी भूषणावह बाब नाही, असा संताप व्यक्त करण्यात आला. शासनाने पेन्शन मंजूर करावी, अन्यथा इच्छामरणाची परवानगी द्यावी, अशी आर्त हाक निवृत्त कर्मचाऱ्यांनी दिली.
२ ऑक्टोबरपासून आमरण उपोषणाचा इशारा
मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ, छत्रपती संभाजीनगर खंडपीठ तसेच कोल्हापूर सर्किट बेंचने या कर्मचाऱ्यांना १९८२ ची जुनी पेन्शन लागू करण्याचे सकारात्मक आदेश दिले असतानाही शासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आला. शासनाने २५ सप्टेंबर २०२६ पर्यंत सकारात्मक निर्णय न घेतल्यास २८ सप्टेंबरपासून लाक्षणिक उपोषण आणि २ ऑक्टोबर २०२६ पासून आमरण उपोषण छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
या आंदोलनात राज्य समन्वयक संदेश राऊत, राज्य प्रतिनिधी रामचंद्र केळकर, जिल्हा उपाध्यक्ष रुस्तुम मुल्ला, रवींद्र सुर्वे, जिल्हा सचिव संदेश रहाटे, सहसचिव महेंद्र पवार, मुख्याध्यापक संघटना सचिव महेश पाटकर, पदाधिकारी श्रीशैल्य पुजारी, तालुका अध्यक्ष प्रदीप पवार, राजापूर तालुका अध्यक्ष पी. एम. पाटील, सुभाष सोकासने, म्हस्के सर आदींनी मार्गदर्शन केले. या मूक मोर्चास जिल्ह्यातील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.