घोषवाक्यातून उमटला सर्जनशीलतेचा हुंकार

आस्था फाऊंडेशनच्या राज्यस्तरीय घोषवाक्य स्पर्धेला ८५० हून अधिक स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

खुल्या गटात मानसी शिंदे, तिसरी ते पाचवीत मानसी सुकाळे; सहावी ते नववीत देवस्वी तांबे प्रथम

स्वप्निल कदम कुडाळ :

आस्था फाऊंडेशन, कुडाळ (सिंधुदुर्ग) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय घोषवाक्य स्पर्धेत खुल्या गटात मानसी शिंदे, इयत्ता तिसरी ते पाचवी गटात मानसी सुकाळे, तर इयत्ता सहावी ते नववी गटात देवस्वी तांबे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेला राज्यभरातून तब्बल ८५० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदविला.

ज्ञान, सर्जनशीलता आणि सामाजिक जाणीव यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित या स्पर्धेचे बक्षीस वितरण बॅ. नाथ पै कॉलेज, एमआयडीसी, कुडाळ येथे उत्साहात पार पडले.

इयत्ता तिसरी ते पाचवी गटात प्रथम मानसी सुकाळे (श्री कलेश्वर विद्यामंदिर, नेरूर), द्वितीय आरोही कदम (जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा, कुडाळ-कुंभारवाडा), तृतीय रुद्र देसाई (जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा, कुडाळ-कुंभारवाडा), चतुर्थ गार्गी आजगावकर (जि. प. शाळा, कुडाळ एमआयडीसी-कुंभारवाडा) आणि पाचवा क्रमांक प्रणिता गुरव (पांडुरंगशेठ पडतेवाडी, कुडाळ) यांनी मिळविला. उत्तेजनार्थ मृण्मयी चव्हाण, युगा राणे, देवश्री मेस्त्री, विहान चव्हाण आणि सादवी दळवी यांची निवड झाली.

इयत्ता सहावी ते नववी गटात प्रथम देवस्वी तांबे (कुडाळ हायस्कूल, कुडाळ), द्वितीय दीप्ती मडकईकर आणि तृतीय मानसी शेट्ये (दोघीही स. का. पाटील विद्यामंदिर, केळुस), चतुर्थ लावण्या नेवगी (श्री कलेश्वर विद्यामंदिर, नेरूर), तर पाचवा क्रमांक मंजिरी सरंबळकर (सरंबळ इंग्लिश स्कूल) हिने मिळविला. उत्तेजनार्थ गौरी रेवंडकर, यश मेस्त्री, सानिया सिकंदर शिंदयाळे, यशदा गोसावी आणि अक्षरा सावंत यांची निवड करण्यात आली.

खुल्या गटात मानसी शिंदे (माणकादेवी, नेरूर) हिने प्रथम, तर शबनम खान (कुडाळ शहर) हिने द्वितीय क्रमांक मिळविला.

बक्षीस वितरण समारंभाला कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर शिरवलकर, बॅ. नाथ पै संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, आस्था फाऊंडेशनचे अध्यक्ष उदय शिरोडकर, केंद्रप्रमुख गोविंद चव्हाण, डॉट कॉम असोसिएशनचे अध्यक्ष संजय बगळे, त्रिमूर्ती संगीत विद्यालयाचे संचालक डॉ. राहुल गव्हाणकर, राजाराम गव्हाणकर, स्वप्नाली सावंत, विद्या शिरोडकर, सायली शिरोडकर, दिलीप मसके, यलाप्पा दळवी, मारुती गुंजाळ, सहदेव घाडी, मिनीनाथ आडसरे, राजेश परब, सहदेव पालकर, योगेश जाधव, श्री आजगांवकर यांच्यासह विद्यार्थी, पालक व शिक्षक उपस्थित होते.

आस्था फाऊंडेशनच्या कार्याचा विस्तार करणार : उदय शिरोडकर

यावेळी उदय शिरोडकर म्हणाले की, आस्था फाऊंडेशन सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक, आरोग्य आणि कला अशा विविध क्षेत्रांशी निगडित काम करीत आहे. समाजातील विविध घटकांना या क्षेत्रांमध्ये जास्तीत जास्त सहकार्य करण्याच्या दृष्टिकोनातून संस्थेची वाटचाल सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाची सुरुवात त्रिमूर्ती संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर करून केली. सूत्रसंचालन मारुती गुंजाळ यांनी केले, तर यलाप्पा दळवी यांनी आभार मानले. यावेळी पोर्टल शिक्षक परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल सायली उदय गोसावी हिचा विशेष गौरव करण्यात आला.