राजापूर तालुका कुणबी पतपेढीच्या ३२ व्या वार्षिक सभेत आगामी पाच वर्षात पाचशे कोटीच्या व्यवसायाचा संकल्प

सभासदांना १२ % लाभांशाला मंजूरी; कोकण विभाग कार्यक्षेत्राला मंजूरी
नव्या शाखा विस्ताराला मंजूरी; संचालक मंडळ व कर्मचारी वृंदाच्या अभिनंदनाचा ठराव

संतोष मोंडे, राजापूर: येथील राजापूर तालुका कुणबी सह. पतपेढीची ३२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात उत्साहात पार पडली. या बैठकीत विषय पत्रिकेवरील विविध विषयांवर सकारात्मक चर्चा होवून सर्वच्या सर्व विषयांना एकमताने मंजूरी देण्यात आली. या बैठकीत सभासदांना १२ टक्के लाभांश वाटपाला मंजूरी देताना पतसंस्थेच्या अहवाल वर्षातील यशस्वी वाटचालीबद्दल अध्यक्ष, उपाध्यक्षांसह संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी वृंदाच्या अभिनंदनाचा ठराव पारित करण्यात आला.

राजापूर हायस्कुल कलामंदिर सभागृहात पतसंस्थेचे अध्यक्ष प्रकाश मांडवकर यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली. याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश लोळगे यांसह सर्व संचालक, पतसंस्थेचे सिईओ जितेंद्र पाटकर उपस्थित होते. बैठकीत पतसंस्थेला कोकण विभाग कार्यक्षेत्राची अधिकृत मंजूरी मिळाल्याची घोषणा करण्यात आली. तर पतसंस्थेच्या नव्या शाखा विस्तारास मंजूरी देताना आगामी पाच वर्षांच्या काळात पतसंस्थेचा एकत्रीत व्यवसाय ५०० कोटींवर नेण्याचा संकल्प या बैठकीत करण्यात आला.

प्रारंभी गणसंख्येअभावी अर्धा तास तहकुब करण्यात आलेली सभा सकाळी ११ वाजता सुरू करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व दिवंगत संस्थापक सदस्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सभेला सुरूवात करण्यात आली. सिईओ श्री. पाटकर यांनी उपस्थित संचालक, सभासद यांचे स्वागत केले. संस्था अध्यक्ष प्रकाश मांडवकर यांनी निवेदन करत सभा सुरू करण्यास अनुमती दीली.

विषय पत्रिकेनुसार सभेला सुरूवात झाली. श्री. पाटकर यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचून दाखविले. त्यानंतर पाटकर यांनी अहवाल वर्षातील आर्थिक प्रगतीचा अहवाल सादर केला. त्यामध्ये अहवाल वर्षात सभासद संख्येमध्ये १०.१७ टक्के वाढ, वसुल भागभांडवलात १७.०८ टक्के, निधीमध्ये २५.०० टक्के, ठेवींमध्ये १७.२८ टक्के, कर्जांमध्ये २८.३० टक्के, खेळते भागभांडवल ३.६८, ढोबळ नफा ५.६२ टक्के, निव्वळ नफ्यात १८.१७ टक्के तर एकत्रित व्यवसायात २१.८० टक्के अशी भरघोस वाढ झाल्याचे नमुद केले. संचालक मंडळाने शिफारस केलेल्या नफा विभागणीस मंजूरी देताना सभासदांना १२ टक्के लाभांश देण्यास मंजूरी देण्यात आली. तर अहवाल वर्षात अंदाजापेक्षा कमी खर्च झाल्याची माहिती देण्यात आली. तर सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाकरिता लेखापरिक्षक म्हणून सिए निलेश पाटणकर यांच्या नावाला मंजूरी देण्यात आली. तर संस्थेला कोकण विभाग कार्यक्षेत्राची मंजुरी मिळाल्याने उपविधीत संस्थेच्या कार्यक्षेत्र बदलाच्या ठरावाला मंजूरी देण्यात आली. तर संस्थेच्या सुसज्य वास्तुसाठी जागा खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली. तसेच विषयपत्रिकेवरील सर्वच विषयांना एकमताने मंजूरी देण्यात आली. या चर्चेत सभासदांनी आपली मते मांडली.

आयत्या वेळच्या विषयांवर सभागृहातून कर्मचारी वेतन वाढी बाबत आग्रह धरण्यात आला. पतसंस्थेची भरभराट होत असताना कर्मचारी वेतन वाढीला मंजूरी देण्यात यावी अशी मागणी सभागृहातून करण्यात आली. त्यावर संस्थाध्यक्ष प्रकाश मांडवकर यांनी कर्मचारी वेतन वाढीबाबत संचालक मंडळ सकारात्मक असून नियमांच्या कक्षेत जे जे करता येईल ते ते केले जाईल अशी ग्वाही दिली.

अध्यक्षीय भाषणात श्री. मांडवकर यांनी संस्थेच्या स्थापनेपासून ते कोकण विभाग कार्यक्षेत्राच्या मंजूरी पर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेतला. या वाटचालीत अनेक अडथळे, आव्हाने आली मात्र संस्थापक सदस्यांच्या वैचारिक पाठबळावर संस्थेची आजवरची वाटचाल सुरू आहे. त्यांनी घालून दिलेल्या आदर्श आचारसंहितेचे प्रामाणिक आचरण आणि प्रयत्न आम्ही करत असून त्याचेच फळ म्हणून पतसंस्था भक्कमपणे उभी आहे. ज्या वास्तूचा पाया मजबूत ती इमारत कितीही मजले चढले तरी भक्कमच राहते याचे आपले पतपेढी हे उदाहरण असल्याचे मांडवकर यांनी नमुद केले. या वाटचालीत सामान्य सभासद, कर्जदार, संचालक, हितचिंतक, कर्मचारी यांचा सिंहाचा वाटा असल्याची कृतज्ञता व्यक्त केली. आगामी काळात काही नवया शाखांसह पुढील पाच वर्षात ५०० कोटीच्या व्यवसायाची भरारी घ्यायची आहे. त्यासाठी अधीक सक्षम आणि प्रगतीशिल होण्यासाठी अपडेट राहणं तेवढेच आवश्यक असल्याचे नमुद केले.

प्रारंभी दिवंगताना श्रध्दांजली वाहण्यात आली. तर पतसंस्थेच्या पुरस्कारप्राप्त सभासद, ज्येष्ठ सभासद यांचा उचीत गौरव करण्यात आला. तर सर्व सभासदांच्या वतीने अध्यक्ष प्रकाश मांडवकर व संचालकांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी सभासद, अधिकारी व कर्मचारी वृंद मोठया संख्येने उपस्थित होते.