शिक्षक दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब, सावंतवाडी यांच्या वतीने मराठी भाषेचे अध्यापक, राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य तसेच वाचन संस्कृतीचे प्रेरक प्रा. भरत गावडे व त्यांच्या धर्मपत्नी सौ. सायली गावडे यांचा त्यांच्या भटवाडी येथील निवासस्थानी जाऊन विशेष नागरी सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना रोटरी क्लबचे अध्यक्ष रोटेरियन प्रवीण परब यांनी, भरत गावडे यांनी शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाची आणि ‘कथामाला’ उपक्रमातून विद्यार्थ्यांवर उत्तम संस्कार घडवण्याच्या कार्याची प्रशंसा केली. सत्कारप्रसंगी सन्मानपत्र, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन दांपत्याचा यथोचित गौरव करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाचे सदस्य श्री. म. ल. देसाई यांनीही आपले विचार मांडून गावडे यांच्या कार्याचे कौतुक केले.
सत्काराला उत्तर देताना प्रा. भरत गावडे म्हणाले, “मराठी भाषेवरील निष्ठा आणि प्रेमामुळेच मला विविध स्तरांवर कार्य करण्याची संधी मिळाली. आई-वडिलांचे आशीर्वाद आणि संस्कारांमुळेच हे शक्य झाले असून समाज घडवण्याचे हे कार्य अखंड सुरू राहील.”
याप्रसंगी खजिनदार प्रदीप शेवडे, प्रमोद भागवत, दिलीप मापसेकर, विनय काणेकर, आबा कशाळीकर, जिन्नी साहेब, शिक्षिका शिल्पा गोठस्कर, संगीता सोनटक्के, माजी सैनिक कैलास परब, सीताबाई गावडे, शैलेश गावडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार रिया सांगेलकर यांनी मानले.











