भास्कर जाधवांची ही शेवटची टर्म!’ विकासकामांवरून हशमत परकारांचा घणाघाती आरोप

खेड (प्रतिनिधी) : गुहागर विधानसभा मतदारसंघातील विकासकामांच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. गेल्या वर्षभरापासून मतदारसंघातील अनेक भागांमध्ये अपेक्षित विकासकामे झालेली नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते हशमत भाई परकार यांनी केला आहे. विशेषतः खेड तालुक्यातील खाडीपट्टा आणि शिव विभागातील नागरिकांना मूलभूत विकासकामांसाठी सातत्याने पाठपुरावा करावा लागत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
या भागातील नागरिक विकासकामांच्या मागण्यांसाठी शिवसेना नेते रामदास कदम तसेच राज्यमंत्री योगेश कदम यांची वारंवार भेट घेत असल्याचे परकार यांनी सांगितले. खाडीपट्ट्यातून शिवसेनेचे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य निवडून आले असले तरी त्यांच्या उपलब्ध निधीला मर्यादा आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणातील रस्ते, पाणी, आरोग्य आणि अन्य पायाभूत सुविधांची कामे करण्यासाठी विधानसभा मतदारसंघाच्या आमदारांनी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, वेरळ ते शिव या महत्त्वाच्या मार्गाच्या कामावरूनही हशमत परकार यांनी आमदार भास्कर जाधव यांच्यावर निशाणा साधला आहे. या रस्त्याच्या कामासाठी सुमारे नऊ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला होता. मात्र, काम पूर्ण झाल्यानंतर अवघ्या वर्षभरातच रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याचा दावा परकार यांनी केला. त्यामुळे या रस्त्याच्या कामाची गुणवत्ता, खर्च आणि झालेल्या दुरवस्थेबाबत जबाबदारी निश्चित करण्याची मागणी त्यांनी केली.
वेरळ-शिव रस्त्याच्या प्रश्नावर स्थानिक आमदार म्हणून भास्कर जाधव यांना जाब विचारणे आवश्यक असताना या भागातील काही नागरिकांना खेड पंचायत समितीसमोर उपोषणाला बसावे लागल्याचेही परकार यांनी नमूद केले. विकासकामांसाठी नागरिकांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागत असेल तर प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी हशमत परकार यांनी विकासकामांच्या वाटपाबाबतही गंभीर आरोप केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, एखाद्या भागात विकासकामांची मागणी घेऊन गेल्यानंतर त्या भागातील वाडी-वाडीची मतदानाची आकडेवारी तपासली जाते. ज्या भागातून चांगले मतदान झाले आहे, त्या भागाला विकासकामांमध्ये प्राधान्य मिळते; मात्र अपेक्षित मतदान न झालेल्या भागांकडे दुर्लक्ष केले जाते, असा आरोप त्यांनी केला. या आरोपांमुळे गुहागर मतदारसंघातील विकासकामांच्या राजकारणावरून नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.
“ज्या खाडीपट्ट्याने तुम्हाला आमदार म्हणून निवडून दिले, त्या खाडीपट्ट्याच्या विकासाची कामे तात्काळ करा,” अशी कळकळीची विनंतीही परकार यांनी केली. या भागातील विकासकामे का होत नाहीत, मंजूर झालेली कामे निकृष्ट का ठरतात आणि विकासाचा निधी नेमका कुठे खर्च होतो, याचा जाब गुहागर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी आमदार भास्कर जाधव यांना विचारला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
यापुढे त्यांनी थेट आमदार भास्कर जाधव यांच्या राजकीय भवितव्यावर भाष्य करत “भास्कर जाधवांची ही शेवटची टर्म आहे; यापुढे ते निवडून येणार नाहीत,” असा दावा केला. आमदार म्हणून निवडून आल्यानंतर भास्कर जाधव यांनी वेरळ ते शिव या मार्गावर एकदाही प्रवास केला नसल्याचा आरोपही परकार यांनी केला.
“आता त्यांची शेवटची टर्म आहे, मग ते या रस्त्यावरून प्रवास कशाला करतील? त्यांनी आमचा विभाग सोडून दिला आहे,” अशा शब्दांत हशमत परकार यांनी आमदार जाधव यांच्यावर टीका केली.
दरम्यान, हशमत परकार यांनी केलेल्या या आरोपांमुळे गुहागर विधानसभा मतदारसंघातील विकासाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. रस्त्यांची दुरवस्था, विकासकामांचा निधी, कामांची गुणवत्ता आणि स्थानिक भागांना मिळणारे प्राधान्य यावरून आगामी काळात राजकीय आरोप-प्रत्यारोप आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. परकार यांच्या आरोपांवर आमदार भास्कर जाधव काय भूमिका मांडतात, याकडे आता गुहागर मतदारसंघातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.