राजापूर (प्रतिनिधी): सहकारातुन समृध्दीचा मंत्र जपत राजापूर शहरासह ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणात मोलाची भूमिका बजावणाऱ्या राजापूर महिला नागरी पतसंस्थेची २५ वी वार्षिक अधिमंडळ (सर्वसाधारण) बैठक रविवारी उत्साहात पार पडली. या सभेत पतसंस्थेच्या वतीने यावर्षी १० टक्के लाभांश जाहिर करण्यात आला.
राजापूर येथील नगर वाचनालयाच्या सभागृहात संस्थेच्या अध्यक्षा शितल पटेल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला संस्थेचे संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी वृंद आणि सभासद महिलांची उपस्थिती होती.
बैठकीच्या सुरुवातीला संस्थेच्या मागील वर्षातील प्रगतीचा आणि आर्थिक स्थितीचा अहवाल सादर करण्यात आला. सहकार महर्षींच्या विचारांवर चालत पतसंस्थेने आर्थिक अनुशासन आणि पारदर्शक कारभाराच्या बळावर सभासदांचा विश्वास सार्थ ठरवला आहे. पतसंस्थेच्या प्रगतीचा सर्वसमावेशक आढावा घेत पुढील वर्षाच्या धोरणांवर यावेळी सखोल विचारविनिमय करण्यात आला. बैठकीत मांडण्यात आलेले सर्व विषय आणि ठराव उपस्थित सभासदांनी एकमुखाने आणि सर्वानुमते मंजूर केले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात शितल पटेल यांनी संस्थेच्या यशस्वी वाटचालाबद्दल समाधान व्यक्त केले. सहकारातून समृद्धी साधताना महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी संस्थेने उचललेली पावले अत्यंत प्रभावी ठरल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, कर्मचारी वर्गाच्या समर्पित कामगिरीचा विशेष गौरव करत त्यांनी सर्व सभासद, संचालक मंडळ आणि कर्मचाऱ्यांच्या योगदानाबद्दल आभार मानले.
संस्थेने यावर्षीही सभासदांना १०% लाभांश जाहीर केला आहे. सहकार आणि सामाजिक उत्तरदायित्व जपत संस्थेच्या वतीने राजापूर, आडीवरे व पाचल येथील दहावी-बारावीच्या शिष्यवृत्ती प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा या सभेत सन्मान करण्यात आला. तसेच संस्थेच्या प्रगतीमध्ये कणा ठरलेले सर्व एजंट, निष्ठावान कर्मचारी आणि मा. संचालिका यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
या बैठकीला नायब तहसीलदार दिपाली पंडित, पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी उत्तम भोसेले, राजापूर अर्बन बॅँकेचे संचालक अनिलकुमार करंगूटकर, प्रतिभा रेडीज, यांसह प्रतिभा मराठे, माधवी हर्डीकर, मंजिरी देवधर, कल्याणी रहाटे, प्रतिक्षा खडपे, पुजा मालपेकर, शितल गोठणकर, मिनाक्षी गुरव, सुप्रिया रहाटे आणि पुष्पलता हर्डीकर आदी मान्यवर व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्थेच्या सचिव प्रेरणा अमरे यांनी संस्थेच्या अहवालाचे वाचन केले. तर उपाध्यक्षा शुभांगी सोलगावकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
Home महत्वाच्या बातम्या राजापूर महिला नागरी पतसंस्थेची २५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात सभासदांना १०...











