नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी मालवण शहरातील रस्त्यांची केली पाहाणी 

रस्त्यांवरील खड्डे बुजविणे, रस्ता दुतर्फा वाढलेली झाडी-गवत कटाई जलद गतीने पूर्ण करा 

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कामांचा प्रत्यक्ष आढावा घेत प्रशासनास दिल्या सूचना 

मालवण | प्रतिनिधी : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविक व नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी मालवण नगरपरिषदेच्या वतीने नगराध्यक्ष ममता वराडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील प्रमुख रस्ते व आगमन मार्गांची पाहणी करण्यात आली.

 

रस्त्यांवरील खड्डे बुजविणे, रस्ता दुतर्फा वाढलेली झाडी-गवत कटाई काम जलदगतीने पुर्ण करून रस्ते सुसज्ज करा. अश्या सूचना प्रशासनास दिल्या.

 

 

या पाहणी दौऱ्यातनगराध्यक्ष ममता वराडकर यांसह मुख्याधिकारी प्रतिक शोरात, नगरसेवक ललित चव्हाण यांच्यासह नगरपरिषद अभियंता व मुकादम उपस्थित होते.

 

गणेश चतुर्थीपूर्वी शहरातील प्रमुख रस्ते तसेच आगमन मार्गांची पाहणी करण्यात आली. यावेळी रस्त्यांवर पडलेले खड्डे निदर्शनास आले. हे खड्डे तात्काळ बुजविण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले. तसेच गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्त्यांच्या दुतर्फा वाढलेली झाडी व गवत कापून रस्ते पूर्णपणे स्वच्छ करण्याच्या सूचना आरोग्य यंत्रणेला देण्यात आल्या आहेत.

गणेशोत्सव काळात शहरात मोठ्या प्रमाणात भाविक व नागरिकांची वर्दळ वाढणार आहे. त्यामुळे रस्त्यांची स्थिती, स्वच्छता आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नगरपरिषद प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत.