“मला काही मिळवायचे नाही; मतदारसंघाचा चेहरा राज्याच्या नकाशावर चमकवायचा आहे” — निलेश राणे
गणेश घाट व परिसर सुशोभीकरण कामाचा लोकार्पण सोहळा उत्साहात; विकासकामांवरून विरोधकांना दिले थेट प्रत्युत्तर
स्वप्निल कदम-कुडाळ : “कोकणाने आम्हाला खूप काही दिले आहे. आम्ही येथे कमावण्यासाठी आलेलो नाही. मला काहीच मिळवायचे नाही; मला सर्व काही मिळाले आहे. जनतेने आम्हाला मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता, केंद्रीय मंत्री, पालकमंत्री, खासदार आणि आता आमदार अशा विविध जबाबदाऱ्या देत मोठे केले. जनतेने केलेले हे उपकार आता फेडायचे आहेत. त्यासाठी जनतेचे सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहे,” असे भावनिक प्रतिपादन कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांनी केले.
कुडाळ येथील गणेश घाट व परिसर सुशोभीकरण कामाच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी आमदार राणे यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधत गणेश घाटाच्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना कामाच्या मंजुरीपासून लोकार्पणापर्यंतच्या तारखांचा दाखला देत थेट प्रत्युत्तर दिले.
“गणेश घाटाच्या कामाला २२ जून २०२५ रोजी शासनाची मंजुरी मिळाली. १ सप्टेंबर २०२५ रोजी निविदा निघाली, तर २९ सप्टेंबरला वर्क ऑर्डर मिळाली. २९ ऑक्टोबर २०२५ रोजी माझ्याच कार्यकाळात या कामाचे भूमिपूजन झाले आणि आज त्याचे लोकार्पण होत आहे,” असे सांगत आमदार राणे यांनी कामाच्या मंजुरीपासून पूर्णत्वापर्यंतचा घटनाक्रमच व्यासपीठावर मांडला.
“मी कधीही श्रेयवादात जात नाही. मला श्रेय मिळावे म्हणून मी काम करीत नाही. माझ्या सहकाऱ्यांनाही दुसऱ्याच्या कामाचे श्रेय घेऊ नका, असे नेहमी सांगतो. आपली किंमत टिकवायची असेल तर आपल्या कामाची माहिती पुराव्यानिशी आणि तारखेसहित देता आली पाहिजे,” असे सांगत त्यांनी गणेश घाटाच्या कामाचे श्रेय घेण्यासाठी धडपडणाऱ्यांना आरसा दाखविला.
‘आपले कामच बोलले पाहिजे’
कार्यकर्त्यांना कानमंत्र देताना आमदार राणे म्हणाले, “काम असे करा की त्याला कोणताही डाग लागता कामा नये. दर्जेदार काम केल्यास आपल्याला बोलण्याची गरज पडत नाही; आपले कामच बोलले पाहिजे. मागील दहा वर्षांत जे घडले नाही ते घडविण्याचा मी प्रयत्न करीत आहे. मला माझा मतदारसंघ जिंकवायचा आहे. राज्याच्या नकाशावर माझा मतदारसंघ चमकविण्याची माझी धडपड आहे.”
जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादासाहेब साईल यांनी मनोगत व्यक्त करताना मागील दहा वर्षांत मतदारसंघाची विकासाची पाटी कोरी राहिल्याची टीका केली. आमदार निलेश राणे यांनी विकासकामांसह विविध क्षेत्रांतील प्रश्न विधानसभेत मांडून ते मार्गी लावले आहेत. त्यांनी मतदारसंघाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलू लागला असून, असे आमदार लाभल्याचा अभिमान असल्याचे साईल यांनी सांगितले.
शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर जोरदार टीका केली. “माजी आमदारांना कोणतेही कामधंदे नसल्याने ते लोकांची दिशाभूल करीत आहेत. त्यांच्या याच स्वभावामुळे मतदारसंघावर ही परिस्थिती आली,” अशी टीका सामंत यांनी केली.
दरम्यान, आमदार निलेश राणे यांनी पहिल्याच अधिवेशनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रश्न अग्रक्रमाने मांडल्याचे सांगत त्यांच्या कामाचा लेखाजोखा मांडण्यात आला. आमदार राणे यांच्या कार्यकाळात कुडाळ-मालवण मतदारसंघात कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून, कुडाळ शहरातील विविध विकास प्रकल्पांनाही गती मिळाल्याचे यावेळी सांगण्यात आले.
नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांनी आमदार निलेश राणे यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे गणेश घाटाचे काम जलदगतीने पूर्ण झाल्याचे सांगून त्यांचे आभार मानले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या व वजनी गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी विशेष ट्रॉलीची व्यवस्था करण्यात येणार असून भाविकांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र सुरक्षा पथक तैनात केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणेचे आभार मानण्यात आले.
कार्यक्रमास शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर, उपनगराध्यक्ष किरण शिंदे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, सभापती मिलिंद नाईक, मुख्याधिकारी खंडू पवळ, प्रसाद रेगे, काका कुडाळकर, संजय पडते, महिला जिल्हाप्रमुख दीपलक्ष्मी पडते, भाजप तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, व्यापारी संघटना तालुकाध्यक्ष पी.डी. शिरसाट, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष दीपक नारकर, माजी नगराध्यक्ष ओंकार तेली, विनायक राणे, युवा सेना जिल्हाप्रमुख स्वरूप वाळके, नगरसेवक विलास कुडाळकर, अभिषेक गावडे, अॅड. राजीव कुडाळकर, उदय मांजरेकर, गणेश भोगटे, आफरीन करोल, अक्षता खटावकर, नयना मांजरेकर, चांदणी कांबळी, सई काळप, ज्योती जळवी, निलेश परब, श्रुती वर्दम तसेच नगरपंचायत व पर्यटन विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याधिकारी खंडू पवळ यांनी केले. सूत्रसंचालन व आभार बादल चौधरी यांनी मानले.













