जन्मोजन्मी हीच सहचारिणी लाभो, पत्नीचा सन्मान व समानतेचा संदेश देणारा १८ वर्षांचा आगळावेगळा उपक्रम
स्वप्निल कदम -कुडाळ,
भारतीय संस्कृतीत वटपौर्णिमेचे व्रत हे पत्नी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी श्रद्धेने आणि भक्तिभावाने करत असते. मात्र या परंपरेला एक संवेदनशील आणि सकारात्मक दिशा देत पत्नीच्या प्रेम, त्याग, समर्पण आणि संसारातील अनमोल योगदानाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कुडाळ येथील गवळदेव येथे पुरुषांची वटपौर्णिमा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. उमेश गाळवणकर मित्र मंडळ व डॉ. संजय निगुडकर यांच्या मित्र परिवारातर्फे आयोजित हा आगळावेगळा उपक्रम यंदा सलग १८ व्या वर्षी उत्साहात पार पडला.
संसाराचा गाडा सुरळीत चालविताना स्त्री अनेक भूमिका पार पाडत असते. ती केवळ पत्नी नसून आई, मैत्रीण, सल्लागार, कुटुंबाला एकत्र बांधून ठेवणारी शक्ती आणि प्रत्येक यशामागे निःस्वार्थपणे उभी राहणारी प्रेरणा असते. तिच्या या निःस्वार्थ योगदानाचा सन्मान व्हावा, तिच्याविषयी आदर आणि कृतज्ञतेची भावना प्रत्येक पुरुषाच्या मनात जागृत व्हावी, तसेच जन्मोजन्मी हीच सहचारिणी लाभावी, या उदात्त भावनेतून या अनोख्या व्रताचे आयोजन करण्यात आले.
ब्राह्मणांच्या मंत्रोच्चारात सहभागी पुरुषांनी विधिवत वडाच्या झाडाची पूजा केली. त्यानंतर सर्वांनी वडाला सात प्रदक्षिणा घालत पत्नीच्या उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख-समृद्धी आणि अखंड सहजीवनासाठी प्रार्थना केली. उपस्थित प्रत्येकाच्या चेहऱ्यावर पत्नीप्रती असलेला आदरभाव आणि कृतज्ञतेची भावना स्पष्टपणे दिसून येत होती.
या प्रसंगी बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, बॅ. नाथ पै आर्ट्स, कॉमर्स, सायन्स महिला महाविद्यालय व रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य अरुण मर्गज, बी.एड. महाविद्यालयाचे प्राचार्य परेश धावडे, प्रा. नितीन बांबर्डेकर, ज्येष्ठ दशावतारी कलाकार राजू कलिंगण, डॉ. प्रणव प्रभू व डॉ. चैताली प्रभू, प्रसाद कानडे, महादेव परब, ओंकार कदम, संतोष पडते, सुनील गोसावी, ज्ञानेश्वर तेली तसेच परिसरातील अनेक ज्येष्ठ व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी पत्नी ही पुरुषाची खरी ताकद असून तिच्या प्रेम, विश्वास, संयम आणि त्यागामुळेच कुटुंबाची घडी भक्कम राहते, असे मत व्यक्त केले. स्त्रीचा सन्मान हा केवळ एका दिवसापुरता मर्यादित न राहता दैनंदिन जीवनातील प्रत्येक कृतीतून दिसला पाहिजे. परस्पर आदर, विश्वास, प्रेम आणि समानतेवरच सुखी संसाराचा पाया उभा राहतो, असा मोलाचा संदेशही या उपक्रमातून देण्यात आला.
अंधानुकरणापेक्षा परंपरेला सामाजिक जाणीवेची जोड देत, पत्नीप्रती कृतज्ञता आणि स्त्री-सन्मानाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविणारा हा ‘पुरुषांची वटपौर्णिमा’ उपक्रम उपस्थितांच्या मनात कायमची छाप उमटवून गेला.












