माजी सभापती व जि.प. व जन आरोग्य समिती अध्यक्ष पूजा निकम यांच्या उपस्थितीत सावर्डे येथे जन आरोग्य समितीची बैठक उत्साहात

चिपळूण (प्रतिनिधी) : सावर्डे येथे जन आरोग्य समितीची महत्त्वपूर्ण बैठक जिल्हा परिषद सदस्या तथा चिपळूण पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. पूजा निकम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांना वेळेत व दर्जेदार उपचार, औषधांची उपलब्धता, आरोग्य केंद्रातील मूलभूत सुविधा तसेच ग्रामीण भागातील आरोग्यविषयक विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.
तसेच जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या अंगणवाडी शाळा गटातील बालकांना मिळणारा पोषण आहार, त्याची गुणवत्ता व नियमित उपलब्धता, बालकांचे आरोग्य आणि महिला व बालकल्याण विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. लसीकरणाबाबत जनजागृती करण्यावर विशेष भर देण्यात आला. नियमित लसीकरणासोबतच किशोरवयीन मुलींसाठी HPV (Human Papillomavirus) लसीकरणाचे महत्त्व, गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून होणारे संरक्षण आणि लसीकरणाबाबत पालक व विद्यार्थिनींमध्ये योग्य माहिती पोहोचविण्यासाठी आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, अंगणवाडी व आशा सेविकांनी समन्वयाने जनजागृती करावी, अशा सूचना सौ. पूजा निकम यांनी दिल्या. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह इतर शहरांमधून मोठ्या संख्येने नागरिक व चाकरमानी गावाकडे येणार असल्याने त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्राथमिक आरोग्य केंद्राने विशेष सतर्कता बाळगावी, अशा सूचनाही बैठकीत देण्यात आल्या. गणेशोत्सव काळात आरोग्य केंद्रात आवश्यक औषधसाठा, वैद्यकीय सुविधा व मनुष्यबळ उपलब्ध ठेवावे. तसेच ताप, सर्दी, खोकला, डेंग्यू, मलेरिया, अतिसार यांसारख्या आजारांची लक्षणे आढळल्यास तातडीने तपासणी व उपचार करण्यात यावेत, यासाठी आरोग्य विभागाने आवश्यक नियोजन करावे, असे निर्देश देण्यात आले. शाळांमधील विद्यार्थ्यांचे आरोग्य, आरोग्य तपासणी, पोषण, स्वच्छता व लसीकरण याबाबतही संबंधित विभागांनी आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश देण्यात आले.
दरम्यान सावर्डे ग्रामपंचायत तंटामुक्ती अध्यक्षपदी बाबू चव्हाण यांची नुकतीच निवड ग्रामपंचायतमध्ये झाली. आरोग्य समितीच्या सभेमध्ये त्यांचे अभिनंदन करण्यात आले. या सभेप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य संजय कदम, जिल्हा परिषद सदस्या सौ. रावी मोरे, पंचायत समिती सदस्य शौकत माखजनकर, सावर्डे गावचे तंटामुक्ती अध्यक्ष बाबू चव्हाण, जन आरोग्य समितीचे सदस्य, वैद्यकीय अधिकारी, बांधकाम विभाग, शिक्षण विभाग, महिला व बालकल्याण विभागाचे बालविकास प्रकल्प अधिकारी, अंगणवाडी विभागातील अधिकारी, आशा सेविका तसेच इतर संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. ग्रामीण भागातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात आणि आरोग्य, पोषण व लसीकरणाच्या योजनांचा लाभ प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावा, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन सौ. पूजा निकम यांनी केले.