चतुर्थीपूर्वी शेवरे, ओंबळमध्ये BSNLचे 4G टॉवर कार्यान्वित

पालकमंत्री नितेश राणे यांनी केला शब्द खरा ; नाद, शेवरे, ओंबळ, महाळुंगे परिसरातील नागरिकांना मिळणार मोठा लाभ

देवगड : गेल्या अनेक वर्षांपासून मागणी असलेले शेवरे आणि ओंबळ येथील BSNLचे 4G टॉवर आजपासून कार्यान्वित झाले आहेत. गणेश चतुर्थीपूर्वी दोन्ही टॉवर सुरू करण्याचे आश्वासन पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले होते. त्यानुसार टॉवर कार्यान्वित झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, पालकमंत्र्यांचे पंचक्रोशीतील नागरिकांकडून मनापासून आभार मानण्यात येत आहेत.

शेवरे व ओंबळ या ग्रामीण भागातील दोन्ही गावांमध्ये BSNLचे टॉवर सुरू करण्याची मागणी बऱ्याच वर्षांपासून होती. टॉवर उभारणीचे काम सुमारे सहा महिन्यांपूर्वीच पूर्ण झाले होते. मात्र, प्रत्यक्ष सेवा सुरू झालेली नव्हती. त्यामुळे टॉवर कार्यान्वित करण्यासाठी ओंबळचे सरपंच अरुण पवार, शिरगाव परिसरातील पदाधिकारी तसेच स्थानिक नागरिकांकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता.

याबाबत पालकमंत्री नितेश राणे यांच्याशी वारंवार संपर्क साधून टॉवर सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. पालकमंत्र्यांनी गणेश चतुर्थीपूर्वी कोणत्याही परिस्थितीत दोन्ही टॉवर कार्यान्वित केले जातील, असा शब्द दिला होता. त्यानुसार आज दोन्ही टॉवर सुरू झाले आहेत.

गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर तसेच सणासाठी मुंबई, पुणे आणि अन्य शहरांतून मोठ्या संख्येने चाकरमानी गावाकडे येत असताना BSNLची 4G सेवा सुरू झाल्याने नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेटची सुविधा उपलब्ध झाल्याने दैनंदिन संपर्कासह विविध ऑनलाइन कामांनाही यामुळे मदत होणार आहे.

या कामासाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्यासह अमित साटम, राजू शेठ्ये, संतोष फाटक आणि बंड्या नारकर यांनीही प्रयत्न केल्याचे सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांनी सांगितले.

या दोन्ही टॉवरचा फायदा केवळ शेवरे आणि ओंबळ या दोन गावांपुरता मर्यादित राहणार नसून नाद, शेवरे, ओंबळ आणि महाळुंगे यासह आजूबाजूच्या अनेक भागातील नागरिकांना होणार आहे. ग्रामीण भागातील दीर्घकाळ प्रलंबित असलेली मोबाईल नेटवर्कची समस्या दूर होण्यास यामुळे मदत होणार असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.