विद्यार्थ्यांसह ग्रामीण प्रवाशांचा आक्रोश; आंदोलनाच्या दबावानंतर आगार प्रशासन नमले
खेड (प्रतिनिधी) : खेड एसटी महामंडळाच्या खेड आगारातील नियोजनशून्य व मनमानी कारभारामुळे शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच ग्रामीण भागातील प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीच्या वतीने खेड एसटी बस स्थानकावर जोरदार धडक आंदोलन करण्यात आले. भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनाला विद्यार्थी, पालक, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. आंदोलनाच्या वाढत्या दबावामुळे अखेर आगार प्रशासनाला मागण्यांबाबत लेखी आश्वासन देत नमते घ्यावे लागले.
खेड तालुक्यातील ग्रामीण भागातून दररोज मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षणासाठी खेड शहरात येतात. मात्र विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी असलेल्या शाळा-महाविद्यालयीन बसफेऱ्या वेळेवर उपलब्ध होत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याच्या तक्रारी वारंवार करण्यात येत होत्या. अनेक वेळा अधिकृत बस थांब्यावर विद्यार्थी उभे असतानाही चालकांकडून बसेस न थांबवता पुढे नेल्या जात असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. याशिवाय रात्रवस्तीच्या बसेस वेळेवर न सुटणे, ग्रामीण भागातील प्रवाशांना वेळेवर वाहतूक सुविधा न मिळणे आणि आगारातील काही कर्मचाऱ्यांकडून प्रवाशांशी अरेरावीचे वर्तन होत असल्याच्या तक्रारीही यावेळी मांडण्यात आल्या.
या प्रश्नांवरून भाजपा नेते ॲड. वैभव खेडेकर यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि स्थानिक नागरिक खेड एसटी आगारात एकत्र आले. प्रशासनाच्या निष्क्रिय कारभाराविरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या दैनंदिन प्रवासाचा प्रश्न तातडीने सोडवावा, ग्रामीण भागातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करावी आणि प्रवाशांशी गैरवर्तन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
आंदोलनाची तीव्रता वाढत असतानाच खेड आगार प्रशासनाने आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. त्यानंतर खेड आगार व्यवस्थापकांनी भाजपा खेड तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे यांच्या नावे अधिकृत लेखी पत्र देऊन विविध मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठीच्या बसफेऱ्या निर्धारित वेळापत्रकानुसार सोडण्यात येतील, ग्रामीण भागातील सर्व अधिकृत थांब्यांवर बसेस थांबवून विद्यार्थ्यांना व प्रवाशांना सेवा देण्यात येईल, तसेच बस थांब्यावर न थांबवणाऱ्या चालकांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले.
तसेच रात्रवस्तीच्या गाड्या वेळेत सोडण्याची कार्यवाही करण्यात येईल आणि खेड एसटी बस स्थानकातील स्वच्छतागृहांची नियमित स्वच्छता राखण्यात येईल, असेही लेखी आश्वासनात नमूद करण्यात आले आहे. प्रवाशांशी गैरवर्तन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याबरोबरच वादग्रस्त कर्मचाऱ्याच्या बदलीचा प्रस्ताव सक्षम प्राधिकरणाकडे पाठविण्याचे आश्वासनही आगार प्रशासनाने दिले.
लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र, प्रशासनाने दिलेल्या आश्वासनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली नाही, तर पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही भाजपा पदाधिकाऱ्यांनी दिला. त्यामुळे खेड आगार प्रशासन आता या आश्वासनांची कितपत प्रभावी अंमलबजावणी करते, याकडे विद्यार्थी, पालक आणि ग्रामीण प्रवाशांचे लक्ष लागले आहे.
या आंदोलनावेळी भाजपा खेड तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे, भाजपा खेड शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, भाजपा युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस ॲड. मिलिंद उर्फ दादू नांदगांवकर, भाजपा अल्पसंख्याक सेल रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा खेड नगर परिषदेचे नगरसेवक गटनेते रहीम सहिबोल, माजी नगरसेविका तथा भाजपा महिला मोर्चा खेड शहराध्यक्षा आशा सनगरे, भाजपा महिला मोर्चा खेड शहर उपाध्यक्ष प्रीती चिखले, भाजपा खेड तालुका उपाध्यक्ष मनोज गायकवाड, भाजपा खेड शहर उपाध्यक्ष राहुल पाटणे, भाजपा युवा मोर्चा खेड तालुकाध्यक्ष विशाल होळकर, भाजपा तालुका उपाध्यक्ष अविराज मोरे, भाजपा युवा मोर्चा खेड शहराध्यक्ष स्वराज गांधी, भाजपा खेड तालुका सरचिटणीस शुभम गायकवाड, भाजपा खेड शहर सरचिटणीस विजय गुप्ता, माजी नगरसेवक संदेश भुवड, भाजपा खेड शहर चिटणीस अनिकेत पवार, भाजपा सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार, ओवैस चौगुले, अक्षय सनगरे, मिलिंद शिंदे, प्रदीप भोसले, सुयश खेडेकर यांच्यासह तालुक्यातील विद्यार्थी, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.













