मराठवाड्यातून थेट कोकणासाठी गणेशोत्सव विशेष रेल्वे

नांदेड-सावंतवाडी रोडदरम्यान १२, १५ सप्टेंबरला विशेष गाडी; गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा

नांदेड : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी असून, दक्षिण मध्य रेल्वेने नांदेड-सावंतवाडी रोडदरम्यान गणेशोत्सव विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यामुळे यश आले आहे. ही विशेष गाडी नांदेड-पुणे-कल्याण-रत्नागिरी मार्गे सावंतवाडी रोडपर्यंत धावणार आहे.

 

गाडी क्रमांक 07659 नांदेड-सावंतवाडी रोड विशेषच्या १२ आणि १५ सप्टेंबर २०२६ रोजी फेऱ्या होणार आहेत. ही गाडी नांदेडहून रात्री ८ वाजता सुटेल आणि प्रवासाच्या तिसऱ्या दिवशी पहाटे ३.३० वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल.

 

परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक 07660 सावंतवाडी रोड-नांदेड विशेषच्या १४ आणि १७ सप्टेंबर रोजी फेऱ्या होणार आहेत. ही गाडी सावंतवाडी रोड येथून सकाळी ७.३० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ११.३० वाजता नांदेड येथे पोहोचेल.

 

या विशेष रेल्वेला नांदेड, पूर्णा, परभणी, परळी वैजनाथ, लातूर रोड, लातूर, येडशी, बार्शी टाऊन, कुर्डुवाडी, दौंड, पुणे, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी रोड या प्रमुख स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.

 

या गाडीला एकूण २४ डबे असतील. त्यामध्ये २-टियर वातानुकूलित श्रेणीचे ३ डबे, ३-टियर वातानुकूलित श्रेणीचे ५ डबे, शयनयान श्रेणीचे १० डबे, सामान्य द्वितीय श्रेणीचे ४ डबे आणि २ एसएलआर/लगेज व्हॅनचा समावेश आहे.

 

गणेशोत्सवासाठी मराठवाड्यातून मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात येतात. या पार्श्वभूमीवर नांदेड, लातूर, परभणी तसेच मराठवाड्यातील अन्य भागातील प्रवाशांना कोकणाशी थेट रेल्वे जोडणी मिळणार असल्याने मोठा दिलासा मिळणार आहे. विशेषतः रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रवाशांना या गाडीचा लाभ होणार आहे.

 

या विशेष गाडीसाठी रेल्वे प्रशासनाकडून विशेष भाडे दर आकारले जाणार आहेत. गणेशोत्सवाच्या काळातील वाढती प्रवासी गर्दी लक्षात घेता या विशेष रेल्वेमुळे नियमित गाड्यांवरील गर्दीचा ताण कमी होण्यासही मदत होणार आहे.

 

मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही विशेष गाडी उपलब्ध झाली असून, याबद्दल रेल्वे प्रशासनाचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत.