सावंतवाडी बसस्थानकातील महिला व विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांनी प्रत्यक्ष भेट देऊन जाणून घेतल्या समस्या

महिला पोलीस नेमण्याच्या सूचना : ‘पिंक रिक्षा ‘ सारखा पर्याय राबवणार   

सावंतवाडी । प्रतिनिधी :सावंतवाडी बसस्थानकात महिलांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून छेडछाडीबाबत विद्यार्थ्यांकडून मिळालेल्या तक्रारींची दखल घेत नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांनी सायंकाळी बसस्थानकाला प्रत्यक्ष भेट देऊन तेथील समस्या जाणून घेतल्या. महिला व विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत परिस्थिती चिंताजनक असून, याप्रकरणी पालकमंत्री नितेश राणे यांचे लक्ष वेधणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बसस्थानकात भेट देऊन नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांनी तेथील विद्यार्थी आणि महिलांशी थेट संवाद साधला. यावेळी उपस्थित महिला व विद्यार्थ्यांनी आपली कैफियत त्यांच्यासमोर मांडली. शालेय विद्यार्थ्यांनी छेडछाड होत असल्याची तक्रार केल्यामुळे ही भेट देण्यात आल्याचे नगराध्यक्षांनी सांगितले. बसस्थानकातील पोलीस चौकी सध्या बंद अवस्थेत असून, रात्रीच्या वेळी या ठिकाणी मद्यपींचा वावर असतो. परिसरात दारूच्या बाटल्या पडलेल्या आढळत असल्याने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी महिला पोलिसांची नेमणूक करण्याची मागणी करण्यात आली असून, रात्रीच्या वेळी किमान दोन पोलीस कॉन्स्टेबल उपलब्ध करून देण्यासाठी पालकमंत्र्यांकडे पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. ग्रामीण भागातून येणाऱ्या प्रवाशांना योग्य सुविधा मिळाव्यात हा मुख्य उद्देश असून, शहरात ‘पिंक टॅक्सी’सारखी संकल्पना राबविण्यावर भर देण्यात येईल आणि नगरपरिषदेच्या वतीने पूर्ण सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी बसस्थानकात जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्याने सभापती आनंद नेवगी आणि प्रतिक बांदेकर यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना चांगलेच खडेबोल सुनावले. यानंतर स्थानक प्रमुख गौतमी कुबडे यांनी घटनास्थळी दाखल होत नगराध्यक्षांशी चर्चा केली. वेंगुर्ला स्थानकात थांबलेल्या विद्यार्थ्यांना बसमध्ये न घेता निघून गेल्यामुळे त्यांना रिक्षाने प्रवास करावा लागल्याची बाब समोर आल्यावर, विद्यार्थ्यांना बसमध्ये न घेणाऱ्या चालकांवर कारवाई केली जाईल, असे स्थानक प्रमुखांनी स्पष्ट केले. तसेच सायंकाळी ७ नंतर पुढील सर्व गाड्या वेंगुर्ला स्थानकातून न सोडता मुख्य स्थानकातूनच सोडल्या जातील, अशी माहिती त्यांनी दिली.

या प्रसंगी नगराध्यक्षांनी हिरकणी कक्ष पूर्ववत सुरू करण्यासाठी आणि बंद असलेल्या पोलीस चौकीत महिला कॉन्स्टेबलची नेमणूक करण्यासाठी तात्काळ आवश्यक पत्रव्यवहार करण्याचे निर्देश दिले. या पाहणीदरम्यान सभापती आनंद नेवगी, प्रतिक बांदेकर, नीलम नाईक, सुनिता पेडणेकर आणि श्री. नाईक यांच्यासह अन्य पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.