सावंतवाडीत एका नामांकित ऑनलाईन कंपनीकडून मोठा घोळ! कुर्ता ऐवजी पाठवली फाटलेली जीन्स; ग्राहकांना सावधानतेचा इशारा

न्हावेली – श्रेयस गावडे.

ऑनलाईन शॉपिंगचे वेड सध्या सर्वांनाच लागले आहे, पण याच ऑनलाईन खरेदीत सावंतवाडी तालुक्यातील एका ग्राहकाला मोठा फटका बसला आहे. एका नामांकित ऑनलाईन कंपनीकडून मागवलेल्या एका कपड्याच्या ऐवजी चक्क फाटलेली जुनी जीन्स पॅन्ट डिलिव्हरी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काही वर्षांपूर्वीही सावंतवाडी परिसरात असे ऑनलाईन फ्रॉड झाले होते, आणि आता पुन्हा असाच प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

 

सावंतवाडी तालुक्यातील एका ग्राहकाने एका नामांकित ऑनलाईन कंपनीकडून ‘sthreevsatra Women Embroidered A-line Kurta’ ऑर्डर केला होता. नेहमीप्रमाणे कंपनीने पार्सल ग्राहकाला डिलिव्हरी देखील केले. मात्र, ग्राहकाने जेव्हा ते पार्सल उघडले, तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला. कुर्त्याऐवजी त्या पार्सलमध्ये एक फाटलेली जीन्स निघाली.

 

या फसवणुकीनंतर ग्राहकाने तात्काळ त्या कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या प्रकाराबाबत जाब विचारला. त्यावर अधिकाऱ्यांनी तुमचे पैसे परत (Refund) केले जातील, असे आश्वासन दिले. परंतु, जेव्हा ग्राहकाने “हे कृत्य कोणी केले? पार्सलमध्ये छेडछाड कोणी केली? ग्राहकांची फसवणूक करणारा तो चोर कोण?” अशी विचारणा केली, तेव्हा अधिकाऱ्यांनी “आम्ही हे सांगू शकत नाही” असे म्हणत हात झटकले.

 

कंपनीने पैसे परत देण्याचे मान्य केले असले, तरी अंतर्गत गैरव्यवहार करणाऱ्या दोषी व्यक्तीचे नाव लपवून ठेवल्यामुळे कंपनीच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे. केवळ पैसे परत करून ती कंपनी आपली जबाबदारी टाळू शकत नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

 

गेल्या काही वर्षांत सावंतवाडी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अशा अनेक घटना घडल्या आहेत, जिथे महागड्या वस्तूंच्या ऐवजी दगड, साबण किंवा जुने कपडे निघतात. डिलिव्हरी बॉय, पॅकिंग विभाग की पुरवठादार (Seller) यांपैकी नेमकी गडबड कुठे होतेय, हे शोधण्यात नामांकित कंपनीची सुरक्षा यंत्रणा अपयशी ठरली आहे. ग्राहकांच्या पैशांची आणि विश्वासाची उघड लूट होत असताना एका नामांकित ऑनलाईन बलाढ्य कंपनी अजून किती दिवस झोपून राहणार, असा संतप्त सवाल विचारला जात आहे. या संपूर्ण फ्रॉड गँगचा उलगडा करण्यासाठी कंपनीने ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.

 

या फसवणुकीमुळे संतप्त झालेल्या ग्राहकाने सर्वांना जाहीर आवाहन केले आहे की, “जोपर्यंत ती नामांकित कंपनी या फ्रॉडचा पूर्ण उलगडा करत नाही, अंतर्गत चोरांचा शोध घेत नाही आणि दोषींवर कायदेशीर कारवाई करत नाही, तोपर्यंत कृपया त्या कंपनी कडून कोणतीही वस्तू मागवू नका. सावध राहा, आज माझ्यासोबत झालेला हा प्रकार उद्या तुमच्यासोबतही होऊ शकतो.”

 

या घटनेमुळे ऑनलाईन कंपन्यांच्या विश्वासार्हतेवर आणि त्यांच्या डिलिव्हरी यंत्रणेवर पुन्हा एकदा मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.