वाहनांची गती रोखण्यासाठी उपाय, आंजणारी ग्रामस्थांसह प्रवासी वर्गाची मागणी
संतोष कोत्रे
लांजा-: अपघातासाठी कुप्रसिद्ध असलेल्या आंजणारी घाटात अपघात टाळण्यासाठी उताराच्या ठिकाणी चार ते पाच ठिकाणी गतिरोधक बसवावेत, अशी मागणी आंजणारी ग्रामस्थांसह प्रवासी वर्गातून केली जात आहे.
आंजणारी घाट हा अवजड वाहनांच्या अपघातासाठी जणू कु प्रसिद्ध ठरत चालला आहे. मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामामध्ये वाहनांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातन कोणत्याही प्रकारची ठोस उपाययोजना न केल्याने या ठिकाणी सातत्याने अपघात होत आहेत. यामध्ये अनेकांचे बळी देखील जात आहेत. चौपदरीकरणांमध्ये मुंबई गोवा महामार्ग सुसाट बनल्याने वाहन चालक आपली वाहने पळवत असतात. मात्र ट्रक, कंटेनर व अन्य अवजड वाहतूक करणाऱ्या वाहनांचे उताराच्या ठिकाणी ब्रेक निकामी होऊन अपघात होत आहेत. तीव्र उतारामुळे वाहन चालकांना वाहनाच्या गतीवर ब्रेक लावणे अवघड होते आणि त्यानंतर ही वाहने ते तर महामार्गावर पलटी होतात किंवा महामार्गा लगतच्या डोंगरावर जाऊन आदळतात. काही वेळेला रॉंग साईडला जाऊन अन्य वाहनांच्या नुकसानीस कारणीभूत ठरत आहेत.
या ठिकाणी वाहनांची गती कमी करण्यासाठी बॅरल उभे केले आहेत. मात्र ही व्यवस्था तुटपुंजी ठरत आहे. वाहनांची गती रोखायची असेल तर या ठिकाणी वरील भागापासून आंजणारी पुलापर्यंतच्या अंतरात चार ते पाच गतिरोधक बसवणे आवश्यक आहे. यातील पहिला गतिरोधक हा आंजनारी शिंदेवाडीकडे जाणाऱ्या फाट्याजवळ बसवावा. तिथून पुढे ठराविक अंतराने हे गतिरोधक बसवल्यास आपसूकच अवजड वाहनांची गती कमी होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे.
काहीच दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेवला आहे. अशावेळी मोठ्या प्रमाणात चाकरमानी हे रत्नागिरी- सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होणार आहेत. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभागाने प्रवाशांच्या हिताच्या दृष्टीने, त्यांच्या जीवितास धोका पोहोचू नये या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून या उताराच्या ठिकाणी चार ते पाच गतिरोधक बसविण्याच्या दृष्टीने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी, आंजणारी ग्रामस्थ तसेच वाहन चालक, प्रवासी यांच्यातून केली जात आहे.











