जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचाही समावेश
सावंतवाडी । प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व
पंचायत समिती निवडणुकीच्या काळात पक्षशिस्तीचा भंग केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या भारतीय जनता पार्टीच्या १३ पदाधिकाऱ्यांचे निलंबन अखेर मागे घेण्यात आले आहे. या सर्व पदाधिकाऱ्यांना पक्षाकडून पुन्हा एकदा पक्षकार्यात सक्रिय होण्याची संधी देण्यात आल्याची माहिती भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीदरम्यान पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी पक्षशिस्तीच्या विरोधात जाऊन काम केल्याने त्यांच्यावर पक्षीय पातळीवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. मात्र, काही कालावधीनंतर संबंधित पदाधिकाऱ्यांनी आपली चूक लक्षात आल्याचे नमूद करत पक्षाकडे निलंबन रद्द करण्याबाबत अधिकृत विनंती अर्ज सादर केले होते.
या अर्जांची गांभीर्याने दखल घेत पक्षपातळीवर प्रमुख पदाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर शिस्तभंग समितीने केलेल्या शिफारशीनुसार या सर्व १३ पदाधिकाऱ्यांचे निलंबन रद्द करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे.
निलंबन मागे घेण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली जिल्हा परिषद मतदार संघाचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य नितीन एकनाथ राउळ, कोलगाव जिल्हा परिषद मतदार संघाचे जिल्हा परिषद सदस्य मायकल फ्रान्सिस डिसोजा, तुळस जिल्हा परिषद सदस्य सुजाता अजित पडवळ, माजगाव विभागाचे पंचायत समिती सदस्य जितेंद्र पांडुरंग गावकर, माजी जिल्हा परिषद सभापती शर्वाणी शेखर गावकर, भाजपचे माजी बांदा मंडल अध्यक्ष स्वागत रघुवीर नाटेकर, योगेश अशोक केणी, उल्हास उत्तम परब, स्नेहल संदीप नेमळेकर, साक्षी संदीप नाईक, सुप्रिया शैलेश नाईक, प्रवीण नारायण गवस आणि अनिरुद्ध फाटक यांचा समावेश आहे.
या सर्व पदाधिकाऱ्यांना पक्षात पुनरागमन करण्याची संधी देण्यात आल्याने जिल्ह्यातील राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया उमटत असून, आगामी काळात पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी हे सर्व पदाधिकारी पुन्हा सक्रियपणे कार्यरत होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.











