शेतकऱ्यांना कर्जमाफीसह भरीव नुकसानभरपाई द्या..

एम. के. गावडे यांचे कृषिमंत्र्यांना निवेदन : आंबा-काजू उत्पादकांना तातडीने मदतीची मागणी

वेंगुर्ले : प्रतिनिधी

कोकणातील, विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना २०२५-२६ या वर्षात मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. शासनाच्या अहवालानुसार आंबा व काजू पिकांचे सुमारे ९० टक्के नुकसान झाले असून, शेतकऱ्यांना तातडीने भरीव नुकसानभरपाई देण्याबरोबरच कर्जमाफी करावी, अशी मागणी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव एम. के. गावडे यांनी कृषिमंत्री दत्ताराम भरणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

४ सप्टेंबर २०२६ रोजी दिलेल्या निवेदनात गावडे यांनी म्हटले आहे की, नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांनी अनेक आंदोलने, मोर्चे व रास्ता रोको करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा अपेक्षित उपयोग झाला नाही. शेतकऱ्यांनी हेक्टरी आंब्यासाठी ५ लाख रुपये व काजूसाठी ३ लाख रुपये नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी केली होती.

याप्रश्नी सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे तसेच मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडेही शेतकऱ्यांनी मागणी केली होती. शासनाने हेक्टरी २२ हजार ५०० रुपये नुकसानभरपाई जाहीर केली असून, केवळ दोन हेक्टर क्षेत्रापर्यंतच कमाल मर्यादा ठेवण्यात आली आहे. अद्यापपर्यंत अनेक शेतकऱ्यांना ही मदत मिळालेली नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

कोकणातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. इतर भागातील शेतकऱ्यांना विविध योजनांमधून मदत मिळत असताना कोकणातील आंबा-काजू उत्पादक मात्र संकटात आहेत. त्यामुळे शासनाने प्रत्यक्ष कोकणात येऊन परिस्थितीची पाहणी करावी, अशी मागणीही गावडे यांनी केली आहे.

कर्जमाफीची पूर्तता तातडीने करावी, शासनाने जाहीर केलेली नुकसानभरपाई गणपती उत्सवापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी तसेच केंद्र शासनाकडून भरीव मदत मिळवून द्यावी, अशी आग्रही मागणी एम. के. गावडे यांनी कृषिमंत्र्यांकडे केली आहे