गणेशोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी रंगणार माजी विद्यार्थ्यांच्या गप्पांची मैफिल
आरोस : आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूल, आरोसच्या माजी विद्यार्थी संघाच्या वतीने माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याचे आयोजन बुधवार, दि. १६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता प्रशालेच्या अर्जुन सावंत सभागृहात करण्यात आले आहे. शाळेच्या स्थापनेपासून आजपर्यंत शिक्षण घेतलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांना एका व्यासपीठावर आणण्याचा हा प्रयत्न आहे.
सन १९७९ मध्ये आरोस पंचक्रोशी विद्या विकास मंडळाच्या माध्यमातून या प्रशालेची स्थापना झाली. त्यापूर्वी पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना माध्यमिक शिक्षणासाठी दूरच्या गावात किंवा तालुक्याच्या ठिकाणी जावे लागत होते. मात्र शाळा सुरू झाल्यानंतर आरोस, साटेली, तळवणे, मळेवाड, दांडेली, सातार्डा तसेच परिसरातील हजारो विद्यार्थ्यांना आपल्या गावाजवळच शिक्षणाची संधी उपलब्ध झाली. आज या शाळेचे अनेक माजी विद्यार्थी शिक्षण, प्रशासन, उद्योग, व्यवसाय आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करत आहेत.
माजी विद्यार्थ्यांचे शाळेशी असलेले ऋणानुबंध अधिक दृढ व्हावेत आणि शाळेच्या शैक्षणिक व भौतिक विकासासाठी त्यांचे योगदान वाढावे, या उद्देशाने २०२५ मध्ये आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूल माजी विद्यार्थी संघाची स्थापना करण्यात आली. या संघाच्या माध्यमातून ज्ञानवर्धक, सामाजिक व नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
या स्नेह मेळाव्यात माजी विद्यार्थी, आजी-माजी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, संस्थेचे पदाधिकारी आणि हितचिंतक एकत्र येणार आहेत. जुन्या आठवणींना उजाळा देतानाच गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाणार असून, शाळेच्या भविष्यातील विकासासाठी विविध उपक्रमांवर चर्चा होणार आहे. तसेच माजी विद्यार्थी संघाची सदस्य नोंदणीही यावेळी करण्यात येणार आहे.
या स्नेह मेळाव्यास प्रशालेचे सर्व माजी विद्यार्थी, आजी-माजी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक आणि हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूल माजी विद्यार्थी संघाच्या वतीने करण्यात आले आहे.













