रिपाइं आठवले गटाचे मंडणगड बसस्थानकाचे आवारात आक्रमक आंदोलन

जिल्हा युवक सरचिटणीस आदेश मर्चंडे यांच्या आंदोलनास तालुकावासीयांचाही पाठींबा

मंडणगड | प्रतिनिधी :मंडणगड आगाराचे गलथान कारभाराबाबत वांरवार लेखी व तोंडी सुचना देवून अगदी स्वातंत्र्यदिनी आंदोलनाचा इशारा देवूनही अनियमीत सुटणाऱ्या गाड्या, अस्वच्छ परिसर व गैरकारभारात कोणतीही सुधारणा न झाल्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) जिल्हा सरचिटणीस आदेश मर्चंडे यांच्या नेतृत्वाखाली रिपाइंचे तालुक्यातील कार्यकर्त्यांनी 23 ऑगस्ट 2023 रोजी आक्रमक आंदोलन केले. आगारव्यवस्थापनास वारंवार कळित करुनही बसस्थानकाच्या आवारातून गाड्या सुटण्याच्या वेळापत्रकात कोणतीही सुधारणा न झाल्याने तसेच येथील आगार व्यवस्थपकांनी कारभारात सुधाराचे आश्वासन रिपाइंने स्वातंत्र्यदिनी पुकारलेल्या आंदोलनाच्या अनुषंगाने दिलेले असतानाही 23 ऑगस्ट 2023 रोजीही मंडणगड बसस्थानकाच्या आवारातून गावागावात तसेच मुंबई मार्गावर जाणाऱ्या प्रवासी गाड्या दोन दोन तास विलंबाने सुटत असल्याने विद्यार्थी, नागरीक व जेष्ठ नागरीकांची मोठी परवड सुरु होती. याकडे रिपाइंचे तालुक्यातील कार्यकर्त्यांची बारीक नजर होती. त्यामुळे (23) रोजी जिल्हा सरचिटणीस आदेश मर्चंडे आपल्या कार्यकर्त्यांस दुपारी 1.00 वाजण्याच्या सुमारास बसस्थानकात दाखल झाले व कार्यकर्त्यांनी चौकशी कक्षावर हल्लोबोल केला व आगारव्यवस्थापक हनुमंत फडतरे बसस्थानकात दाखल होत नाहीत तोपर्यंत माघार घेणार नसल्याची भुमीका मांडली. यानंतर आगार व्यवस्थापक बसस्थानकाचे चौकशी कक्षात दाखल झाल्यावर कार्यकर्त्यांसह प्रवाशांनीही त्यांना घेराव घालत समस्यांचा पाढाच वाचला. आगार व्यवस्थापकांना धारेवर धरत नुकत्याच पुकारलेल्या आंदोलनांचे आठवण करुन देत या संदर्भात आगार व्यवस्थापकांनी दिलेल्या आश्वासनांची आठवणही करुन देण्यात आली.

यानंतर बसस्थानकाचे परिसरात पिण्याचे पाण्याचा पुरवठा करणारी टाकी पाईप लाईन, तसेच दुर्गधी व अस्वच्छतेने भरलेल्या बसस्थानकाच्या स्वच्छता गृहाची प्रत्यक्षात जागेवर जाऊन पाहणी करण्यात आली. तालुक्यातील नागरीकांना देण्यात येणाऱ्या या वागणुकीबद्दल आगार व्यवस्थपकांच्या कार्यपध्दतीवर कार्यकर्त्यांनी चांगलेच ताशेरे ओढले. या आंदोलनाला रेंगाळलेल्या शेकडो प्रवाशांनी पाठींबा दिला या संदर्भात 26 ऑगस्ट 2023 रोजी मंडणगड आगारास भेट देवून बसस्थानकातून मार्गस्थ होणाऱ्या व स्थानकात येणाऱ्या गाड्याचे आगाराचे नोंद वहीतील वेळापत्रक तपासण्यात येणार असून आगाराची कार्यपध्दती सुरळीत व प्रवाशांच्या सेवेस अनुकुल कऱण्यात आली नाही तर त्याच ठिकाणी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा सरचिटणीस आदेश मर्चंडे यांनी या निमीत्ताने दिला आहे. दरम्यान प्रवाशी सुनील घोसाळकर यांनीही आगारव्यवस्थापका समोर नागरीकांच्या विविध समस्या मांडल्या या आंदोलनात रिपाइंचे तालुकाध्यक्ष नागसेन तांबे, जिल्हा सदस्य किरण पवार, तालुका सरचिटणीस रामदास खैरे, जिल्हा संघटक विजय खैरे, सुनील तांबे, तालुका युवक अध्यक्ष संकेत तांबे, जिल्हा युवक उपाध्यक्ष स्वप्नील धोत्रे, गौरव मर्चंडे, विधान पवार, वीरेंद्र जाधव, संदीप येलवे, संकेत कासारे, अंकुश कासारे,शुभम यादव, कैफ शेख आदी कार्यकर्ते उपस्थित होते.