एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा या मागणीसह अन्य मागण्यांसाठी उपोषण
संतोष कोत्रे
लांजा : विलवडे रेल्वे स्थानकावर एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा या प्रमुख मागणीसह अन्य विविध मागण्यांच्या साठी पूर्ततेसाठी विलवडे रेल्वे स्थानक प्रवासी संघटना मुंबई व ग्रामीण च्या वतीने
२० सप्टेंबर रोजी विलवडे रेल्वे स्थानकावर छेडण्यात येणाऱ्या लाक्षणिक उपोषणाची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
विलवडे रेल्वे स्थानकावर जनशताब्दी एक्सप्रेस, नेत्रावती एक्सप्रेस, मत्स्यगंधा , मांडवी एक्सप्रेस, कोचीवेली एक्सप्रेस या एक्सप्रेसना थांबा मिळावा, दुसऱ्या फलाटची निर्मिती व्हावी, तसेच त्यांना जोडणारा ओव्हर ब्रिज व्हावा, विलवडे स्टेशनला असलेला कोकण कन्या दिवा पॅसेंजर व तुतारी या गाड्यांना आरक्षण कोटा मिळावा, अपंगांसाठी लिफ्ट ची सोय असावी, विलवडे रेल्वे स्थानकावर कोकण रेल्वेचे जनक प्राध्यापक मधु दंडवते यांच तैलचित्र लावण्यास अनुमती द्यावी, लोकल प्रवाशांसाठी खेड सावंतवाडी ही ट्रेन चालू करावी, आदींसह अन्य मागण्यासाठी उपोषण करण्यात येत आहे.
विलवडे रेल्वे स्थानका वरील समस्यांबाबत प्रथमच मोठ्या प्रमाणात लाक्षणिक उपोषण विलवडे रेल्वे स्थानकावर होत आहे. लांजा तालुका पूर्व भाग तसेच राजापूर तालुक्यातील या स्थानकाशी संबंधित येणारे सर्व गावे यासाठी एकवटली असून उपोषणाची तयारी विलवडे रेल्वे स्थानक प्रवासी संघटना मुंबई व ग्रामीण हे एकजुटीने करत आहेत. मुंबईकरानी या उपोषणाची जोरदार तयारी चालू केली असून ग्रामीण भागही अत्यंत मेहनतीने त्यांना साथ देत आहे. जागोजागी उपोषणाचे पोस्टर्स लागले असून. या उपोषणाला पाचशेच्या आसपास किंवा त्याहीपेक्षा जास्त लोक येतील असा अंदाज आहे.
हे लाक्षणिक उपोषण अतिशय शांततेत, कायदा व्यवस्थेला कुठेही तडा जाणार नाही याची काळजी घेऊन केले जाणार आहे. सातत्याने मागणी आणि पत्रव्यवहार करूनही रेल्वे प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने ग्रामस्थांनी हे उपोषणाचे हत्यार उपसले आहे .
हे उपोषण न भूतो न भविष्यती असे करून रेल्वे प्रशासनाला जाग आणूया. यासाठी या उपोषणात सहभागी होण्याचे आवाहन विलवडे रेल्वे स्थानक प्रवासी संघटना मुंबई व ग्रामीण यांच्यावतीने करण्यात आले आहे.













