देवरूख (प्रतिनिधी)
गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मुंबईहून आपल्या संगमेश्वर तालुक्यातील सायले गावी आलेल्या स्वप्नील श्रीकांत कानाल (वय-३१) या तरुणाचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. स्वप्नीलच्या दुर्दैवी मृत्यूने ऐन गणेशोत्सवात सायले गावावर शोककळा पसरली आहे.
कोकणात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गणेशोत्सवासाठी चाकरमानी आपापल्या गावी दाखल होत असतात. स्वप्नील कानाल हासुध्दा गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आपल्या सायले गावी आला होता. त्याच्या गावी येण्याने घरात आनंदाचे वातावरण होते. कुटुंबीयांसोबत गणेशोत्सव साजरा करण्याच्या आनंदात असतानाच काळाने त्याच्यावर घाला घातला. घरातील वीज जोडणीतील बिघाडामुळे स्वप्नीलला विजेचा धक्का लागल्याची प्राथमिक माहिती आहे. या विजेच्या धक्क्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
स्वप्नील हा मितभाषी, मनमिळाऊ आणि हसतमुख स्वभावाचा होता. कुटुंबीयांसह संपूर्ण वाडीतील प्रत्येकाशी त्याचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्याच्या अचानक जाण्याने कुटुंबीयांवरच नव्हे, तर संपूर्ण सायले गावावर दुःखाची छाया पसरली आहे. स्वप्नील याच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे. त्याची थोरली मुलगी अवघ्या तीन वर्षांची, तर धाकटी मुलगी केवळ सहा महिन्यांची आहे. वडिलांच्या जाणिवेपासून अनभिज्ञ असलेल्या या दोन चिमुकल्यांकडे पाहून उपस्थितांचे काळीज पिळवटून निघाले.
ज्या गणरायाच्या स्वागतासाठी स्वप्नील आनंदाने गावी आला त्याच गणेशोत्सवाच्या काळात त्याच्या अकाली निधनाची बातमी गावकऱ्यांच्या काळजाला चटका लावून गेली. आनंदाच्या उत्सवावर दुःखाचे सावट आले असून, सायले गावातील प्रत्येक घर आज स्वप्नील याच्या आठवणीने हळहळत आहे. स्वप्नील याच्या अंत्यसंस्कारासाठी संपूर्ण गाव मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. हसतमुख स्वभावाच्या या तरुणाला अखेरचा निरोप देताना अनेकांच्या डोळ्यांत अश्रू दाटून आले. गणरायाच्या आगमनाने उजळलेल्या घरात काही तासांतच दुःखाचा अंधार पसरला. स्वप्नील याच्या अकाली जाण्याने कानाल कुटुंबाचा आधार हरपला असू सायले गावाने आपला लाडका तरूण गमावल्याची भावना व्यक्त होत आहे. ऐन गणेशोत्सव काळात स्वप्नील अचानक निघून गेल्याने कानाल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.











