मसुरे | झुंजार पेडणेकर : ग्रामपंचायत वडाचापाट व माळगाव आरोग्य मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत कार्यालय वडाचापाट येथे “माझं गाव आरोग्य संपन्न गाव” या संकल्पनेअंतर्गत टी.बी. मुक्त भारत अभियान, एक्स-रे, ईसीजी, बी.पी.,आयुष्मान कार्ड तसेच विविध आरोग्य तपासण्यांचे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात ग्रामपंचायत वडाचापाटच्या सरपंच सौ. सोनिया दयानंद प्रभुदेसाई यांच्या हस्ते व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी मालवण पंचायत समितीचे माजी सभापती श्री. राजेंद्र प्रभुदेसाई, ग्रामपंचायत सदस्य श्री. विनायक प्रभुदेसाई, सौ. वेदिका माळकर, सौ. सोनल मांजरेकर, ग्रामपंचायत अधिकारी श्री. लक्ष्मण सरमळकर, युवा उद्योजक श्री. दयानंद प्रभुदेसाई, सीएचओ श्रीमती भक्ती परब, श्री. सिद्धेश धुरी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
शिबिरामध्ये गावातील महिला, पुरुष तसेच शालेय विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. श्रीमती भक्ती परब यांनी विद्यार्थ्यांना आहार, आरोग्य व निरोगी जीवनशैलीबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी नागरिकांची विविध आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच आयुष्मान कार्ड काढण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली.
या आरोग्य शिबिराचा एकूण १४१ नागरिकांनी लाभ घेतला. नागरिकांना विविध आरोग्य सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देत “माझं गाव आरोग्य संपन्न गाव” या संकल्पनेला प्रत्यक्ष कृतीची जोड देण्यात आली.
शिबिर यशस्वी करण्यासाठी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचारी, अंगणवाडी सेविका व मदतनीस, आशा सेविका, आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचारी तसेच युवा उद्योजक श्री. दयानंद प्रभुदेसाई यांचे विशेष सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामपंचायत अधिकारी श्री. लक्ष्मण सरमळकर यांनी केले, तर सरपंच सौ. सोनिया दयानंद प्रभुदेसाई यांनी उपस्थितांचे आभार मानले.













