साखरीनाटे डोंगर जेटीचे आ. सामंत यांच्या हस्ते उद्घाटन
राजापूर (प्रतिनिधी): तालुक्यातील मच्छीमार बांधवांच्या अडचणी आणि त्यांच्या प्रश्नांची मला पूर्ण जाणीव आहे त्यामुळे तुमचा हक्काचा म्हणून मच्छीमार बांधवांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. मच्छीमार व्यवसायाला आवश्यक असणाऱ्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा केला जाईल अशी ग्वाही आमदार किरण सामंत यांनी साखरीनाटे येथे मच्छीमार बांधवांना दिली.
राजापूर तालुक्यातील साखरीनाटे येथील मच्छीमार बांधवांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या डोंगर जेटीचे उद्घाटन आ. किरण सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. या जेटीमुळे परिसरातील मच्छीमार बांधवांना मासेमारीसाठी ये-जा करताना तसेच नौका सुरक्षितपणे उभी करण्यासाठी मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे.
साखरीनाटे परिसरातील मच्छीमार बांधवांच्या दैनंदिन अडचणी, जेटीशी संबंधित समस्या तसेच मासेमारी व्यवसायासाठी आवश्यक असणाऱ्या मूलभूत सुविधांचा प्रश्न गेल्या काही काळापासून चर्चेत होता. या पार्श्वभूमीवर डोंगर जेटीची सुविधा उपलब्ध झाल्याने स्थानिक मच्छीमारांनी समाधान व्यक्त केले आहे.
कोकणातील मच्छीमार हा अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक असून त्यांच्या व्यवसायाला चालना मिळण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण होणे गरजेचे आहे. जेटी, संरक्षक भिंती, रस्ते, वीज, पाणी तसेच इतर आवश्यक सुविधांच्या माध्यमातून मच्छीमार बांधवांना अधिक चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही आ.सामंत यांनी स्पष्ट केले.
याप्रसंगी सभापती नंदनी कदम, शिवसेना नेते रवींद्र नागरेकर, उपजिल्हा प्रमुख आशफाक हाजू, तालुका प्रमुख दीपक नागले, मच्छीमार नेते अमजद बोरकर, शफी वाडकर, नाटेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, अजगर बांगी ,अल्ताफ बोरकर, सुलतान मोहळकर, मनोज आडवीलकर,विनोद शेलार, आतिफ हातवळकर,हसन हुसेन आदिल मस्कर यांच्या सहित मच्छीमाल बांधव महिलावर्ग पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.













