जपानी पर्यटकाला भावला जैतापूरचा गणेशोत्सव; गावकऱ्यांच्या आपुलकीचे केले कौतुक

जैतापूर (वार्ताहर) : जैतापूरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेशमूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याला जपानहून आलेल्या एका पर्यटकाने आवर्जून हजेरी लावली. गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना सुरू असतानाचे भक्तिमय वातावरण पाहून ते भारावून गेले. यावेळी त्यांनी मूर्तीचे फोटो आणि व्हिडिओही आवर्जून काढले.

उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी गणेशोत्सवाबद्दल उत्सुकतेने माहिती जाणून घेतली. गेल्या दोन वर्षांपासून आपण या परिसरात येत असून, यंदा पहिल्यांदाच जैतापूरमधील गणेशोत्सव प्रत्यक्ष पाहत असल्याचे त्यांनी सांगितले.

जैतापूरच्या माणसांच्या आपुलकीनेही या पर्यटकाला विशेष भावले. शहर आणि गावातील माणसांच्या वागणुकीत बराच फरक जाणवतो. शहरापेक्षा गावातील लोक अधिक प्रेमळ आणि आपुलकीने वागतात, असे निरीक्षण त्यांनी नोंदवले. जैतापूर गावातील नागरिकांनीही आपला चांगला आदरभाव केल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

मात्र, आपला चेहरा आणि चेहऱ्याची ठेवण येथील लोकांपेक्षा थोडी वेगळी असल्याने अनेकजण आपल्याकडे कुतूहलाने निरखून पाहतात. त्यामुळे काही वेळा थोडासा संकोच वाटत असल्याची भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. त्याचवेळी जैतापूरकरांनी दाखवलेल्या प्रेमळ वागणुकीबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

परदेशातून आलेल्या पाहुण्याने जैतापूरच्या गणेशोत्सवाचा अनुभव घेत स्थानिक संस्कृती, श्रद्धा आणि माणुसकीचे केलेले कौतुक हा उपस्थितांसाठीही आनंदाचा क्षण ठरला.

यावेळी जैतापूरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष गिरीश करगुटकर, पत्रकार राजन लाड, खजिनदार श्रीकृष्ण राऊत, सचिव सुनील करगुटकर, मनीष करगुटकर, महेश नारकर , रेशम लाड, राजेंद्रप्रसाद राऊत, गजानन करमळकर आदींसह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. मंडळाच्या वतीने जपानहून आलेल्या पर्यटकाचे औचित्यपूर्ण स्वागत व सन्मान करण्यात आला.