संतोष मोंडे,
राजापूर
अबाल वृध्दांना आनंदाची पर्वणी देणाऱ्या लाडक्या बाप्पाचे घराघरात आगमन झाले असून राजापूर शहर आणि तालुक्यात सर्वत्र धुमधडाक्यात गणेशोत्सवाला प्रारंभ झाला आहे. मोठया प्रमाणावर मुंबईकर चाकरमानीही तालुक्यात दाखल झाले आहेत. गणेशोत्सवात पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याने गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. गावा गावात आणि वाडीवस्तीवर आरती व भजनाचे सुरू घुमत असून आता गौराईच्या आगमनाचे वेध सगळयांना लागले आहेत. गुरूवारी गौराईचे आगमन होणार असून शुक्रवारी गौरी पूजन केले जाणार आहे.
त्यानंतर पाच दिवसांच्या मुक्कामानंतर शनिवार १९ सप्टेंबर रोजी गौरी गणपतींना निरोप देण्यात येणार आहे. तर तालुक्यात ११ ठिकाणी साजरा होत असलेल्या सार्वजनिक गणपतींनाही निश्चित केलेल्या तारखांप्रमाणे मंडळांकडून निरोप देण्यात येणार असून पोलीस प्रशासनाच्या वतीने त्याचीही तयारी व नियोजन हाती घेण्यात आले आहे. घराघरात साजरा होणाऱ्या या उत्सवामुळे अबालांपासून वृध्दांपर्यंत सर्वांचाच आनंद ओसंडून वाहताना पाहायला मिळत आहे.
सोमवारी ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात, ढोल-ताशांच्या गजरात राजापूर शहर आणि ग्रामीण भागात लाडक्या बाप्पाचे अत्यंत उत्साही वातावरणात आगमन झाले. तालुक्यात ११ सार्वजनिक गणपतींसह सुमारे २७ हजार घरगुती गणपतींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये बाप्पाची प्रतिष्ठापना झाल्याने संपूर्ण राजापूर तालुका भक्तीरसात न्हाऊन निघाला आहे. कोकणचा गणेशोत्सव म्हणजे केवळ एक सण नसून, तो संस्कृती, परंपरा आणि कौटुंबिक जिव्हाळ्याचा एक महापर्व आहे, याची प्रचिती यानिमित्ताने येत आहे.
चाकरमान्यांच्या आगमनाने गावांना आली नवसंजीवनी
कोकणच्या गणेशोत्सवाचे खरे वैभव म्हणजे मुंबई, पुणे व इतर भागांतून आलेले ‘चाकरमानी’ आहेत. नोकरी-व्यवसायानिमित्त बाहेर गावी असलेले लाखो चाकरमानी सर्व कष्ट विसरून दरवर्षीप्रमाणे यंदाही राजापुरात मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. चाकरमान्यांच्या या गर्दीमुळे एरवी शांत असणारी राजापूर शहर बाजारपेठ आणि ग्रामीण भागातील वाड्या वस्ती आता गजबजल्या असून, वर्षभरानंतर एकत्र आलेल्या कुटुंबीयांमध्ये आनंदाचे उधाण आले आहे.
वरुण राजाची विश्रांती; भक्तांचा उत्साह दुणावला
उत्सवाच्या सुरुवातीला पावसाची शक्यता वर्तवली जात असतानाच, वरुण राजानेही बाप्पाच्या आगमनावेळी काहीशी विश्रांती घेतल्याने गणेशभक्तांचा उत्साह अधिकच दुणावला आहे. पावसाने उघडीप दिल्यामुळे भाविकांना बाजारपेठेत खरेदी करणे तसेच नातेवाईक व मित्रमंडळींच्या घरी जाऊन गणपती दर्शनाचा लाभ घेणे सोयीचे झाले आहे.
आरती-भजनांच्या सुरांनी मंगलमय वातावरण
वरूण राजानेही काहीशी विश्रांती घेतल्याने गणेश भक्तांचा उत्साह ओसंडून वाहत असून गाव आणि वडीवस्तीवर आरती, भजनाचे सुरू घुमत असून मंगलमय वातावरण पाहायला मिळत आहे. तालुक्यातील घराघरांमध्ये दररोज सकाळी आणि संध्याकाळी होणाऱ्या आरती, सामूहिक भजने आणि लोकगीतांच्या सूरांमुळे वातावरण कमालीचे मंगलमय झाले आहे. मोदक, करंज्या, लाडू अशा विविध गोडधोड नैवेद्यांची रेलचेल असून भाविक तृप्त मनाने बाप्पाच्या चरणी लीन होत आहेत.
गौरी आगमनाचे वेध
आता सगळयांनाच गौरी आगमनाचे वेध लागले असून गुरूवार १७ सप्टेबर रोजी गौराईचे आगमन होणार आहे. तर शुक्रवार १८ सप्टेंबर रोजी गौरी पुजन होणार असून शनिवारी १९ सप्टेंबर रोजी गौरी गणपतींचे विसर्जन होणार आहे.
११ सार्वजनिक गणपतीची प्रतिष्ठापना
तालुक्यात अकरा ठिकाणी सार्वजनिक गणपतींची प्रतिष्ठापना करण्यातप आली असून मोठया भक्तीभावाने सर्वत्र गणेशोत्सव साजरा केला जात आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत गणेशोत्सवात रंगत आणली आहे. तालुक्यात राजापूर शहरातील सार्वजनिक गणपती मंडळाचा यावर्षी शतकपुर्ती गणेशोत्सव आहे. तर शहरात एसटी महामंडळ, महावितरण, पोलीस बॉईज यांसह ओणी, ओझर, दसूर, जैतापूर, आडिवरे बेनगी व नाटे पोलीस या ११ ठिकाणी पारंपारिक पध्दतीने मंडळांकडून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जात आहे.
पाऊस, समृद्धी आणि सुबुद्ध राजकारणासाठी बाप्पाला साकडे
गणेशोत्सव हा केवळ आनंदाचा सण नसून, तो बाप्पाच्या चरणी आपल्या मनातील इच्छा व्यक्त करण्याचे हक्काचे व्यासपीठ आहे. यंदा गणेशभक्तांनी लाडक्या गणरायाच्या चरणी एक विशेष साकडे घातले आहे. चालू हंगामात आणि आगामी काळातही तालुक्यात शेती-भातीसाठी पाऊस चांगला होऊ दे, बळीराजासह सर्वांच्याच घरात सुख-समृद्धी लाभू दे, अशी प्रार्थना भाविक करत आहेत. या जोडणीला राजापूर तालुक्याला प्रदीर्घ काळापासून पडलेले विकासाचे स्वप्न आता लवकर साकार होऊ दे आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या लोकप्रतिनिधींना व राजकारण्यांना योग्य ती सुबुद्धी लाभू दे, असे साकडे लाडक्या बाप्पाला घातले जात आहे. राजकीय हेवेदावे बाजूला सारून सर्वांनी तालुक्याच्या प्रगतीसाठी एकत्र यावे, हीच या वर्षीच्या उत्सवातील भाविकांची मुख्य भावना दिसून येत आहे.
पोलीस प्रशासनाकडून गणपती विसर्जनाचे नियोजन
तालुक्यात घरगुती गौरी गणपतींसह सार्वजनिक मंडळांच्या गणपतींचे वेगवेगळया दिवशी विसर्जन केले जाते. त्याची तयारी पोलीस प्रशासनाने हाती घेतली आहे. शहरातील सार्वजनिक गणपतीची विसर्जन मिरवणूक मंगळवार २२ सप्टेंबर रोजी निघणार आहे. बेनगी येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीचे चार दिवसांनी विसर्जन होणार आहे. दसूर येथील गणपतीचे २१ रोजी व महावितरणच्या, राजापूर आगाराच्या गणपतीचे २२ सप्टेंबर रोजी, ओणी व ओझर व आडिवरे गणपतीचे २५ सप्टेंबर रोजी, राजापूर पोलीस २६ सप्टेंबर, तसेच जैतापूर राजाचे व नाटे पोलीसांच्या गणपतीचे पुर्व नियोजनाप्रमाणे विसर्जन होणार आहे. या सर्व सार्वजनिक गणपतींच्या विसर्जन मिरवणूकांबाबत पोलीस प्रशासनाकडून तयारी करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी गणेशोत्सव काळात चोख पोलीस बंदोबस्ताचे नियोजन केले आहे.












