अणाव दाभाची वाडी येथील मूर्तिकारांची कलाकृती
सावंतवाडी । प्रतिनिधी : कुडाळ तालुक्यातील अणाव दाभाची वाडी येथे कला आणि भक्तीचा एक अनोखा संगम पाहायला मिळत आहे. येथील सुप्रसिद्ध मूर्तिकार सुरेश अंकुश जिकमडे, महेश अंकुश जिकमडे आणि हेमंत सुरेश जिकमडे या कलाकारांनी आपल्या कल्पकतेतून श्री बाळूमामांच्या रूपात साकारलेली अत्यंत नयनरम्य गणेशमूर्ती सध्या संपूर्ण परिसरात विशेष आकर्षण ठरत आहे. संत बाळूमामांच्या भक्तीत लीन झालेल्या या मनमोहक रूपाला पाहण्यासाठी आणि बाप्पाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी होत आहे.
कुडाळ तालुक्यातील रानबांबुळी येथील परब वाडीत राहणारे रामा धोंडी जंगले यांच्या गृही या अद्वितीय गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे. जिकमडे बंधूंच्या हातातील कलाकुसर आणि भावात्मक सौंदर्य यामुळे ही मूर्ती अत्यंत जिवंत वाटत असून, तिचे दर्शन घेताना भाविकांच्या मनात भक्तीचा आणि आनंदाचा उधाण येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून गणेशभक्त या अनोख्या रूपाचे दर्शन घेण्यासाठी जंगले यांच्या निवासस्थानी हजेरी लावत आहेत.
मूर्तिकारांच्या या सुरेख संकल्पनेचे आणि कौशल्याचे सर्वत्र जोरदार कौतुक होत असून, बाळूमामांच्या रूपातील ही बाप्पाची मूर्ती या वर्षीच्या गणेशोत्सवातील प्रमुख आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे.












