‘स्वच्छता ही सेवा २०२६’ अंतर्गत मालवण नगरपरिषदेचा उपक्रम
मालवण | प्रतिनिधी : ‘स्वच्छता ही सेवा २०२६’ अभियान तसेच आंतरराष्ट्रीय सागरी किनारा स्वच्छता दिनाच्या निमित्ताने मालवण नगरपरिषदेच्या वतीने शनिवार १९ सप्टेंबर रोजी चिवला बीच मालवण येथे सागर किनारा स्वच्छता अभियान उत्साहात राबविण्यात आले. सकाळी ७ ते ९ या वेळेत झालेल्या या अभियानात नगराध्यक्षा ममता वराडकर यांसह सदस्य, अधिकारी नागरिकांसह विविध शासकीय विभाग, शैक्षणिक संस्था, सामाजिक संस्था, निसर्गप्रेमी आणि नगरपरिषद अधिकारी-कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. “स्वच्छ समुद्रकिनारा — सुंदर मालवण” आणि “स्वच्छता हीच सेवा, स्वच्छता हीच जबाबदारी” असा संदेश देत अभियानाची सांगता करण्यात आली.
मालवण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या स्वच्छता अभियानात नगरपरिषदेचे सर्व सदस्य, अधिकारी व कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. यावेळी मालवण मत्स्यविभाग कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी, मालवण बंदर निरीक्षक कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी तसेच श्री. पंचम खेमराज महाविद्यालय (एस.पी.के. महाविद्यालय), सावंतवाडी येथील शिक्षक व विद्यार्थ्यांनीही अभियानात सक्रिय सहभाग घेतला.
सर्वांच्या सामूहिक सहभागातून चिवला बीच परिसरातील समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता करण्यात आली. समुद्रकिनाऱ्यावर आढळून आलेला प्लास्टिक कचरा, प्लास्टिक पिशव्या तसेच इतर घनकचरा संकलित करून त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी पाठविण्यात आला.
या अभियानादरम्यान समुद्रकिनारे स्वच्छ व सुंदर ठेवण्याबरोबरच प्लास्टिकचा वापर कमी करणे, कचरा समुद्रात अथवा समुद्रकिनारी न टाकणे आणि सागरी पर्यावरणाचे संवर्धन करण्याबाबत नागरिक व उपस्थितांमध्ये जनजागृती करण्यात आली.
स्वच्छ समुद्रकिनारा आणि निरोगी सागरी पर्यावरण ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचा संदेश या अभियानातून देण्यात आला. नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध शासकीय विभाग, शैक्षणिक संस्था, नगरपरिषद अधिकारी-कर्मचारी आणि नागरिक यांच्या एकत्रित सहभागामुळे चिवला बीच येथील स्वच्छता अभियान यशस्वीरीत्या संपन्न झाले.












