झाडाला धडकून बस थांबल्याने मोठा अनर्थ टळला ; प्रवासी किरकोळ जखमी
वैभववाडी l प्रतिनिधी :चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने कणकवली आगाराची एसटी बस सुमारे २०० फूट खोल दरीत कोसळली. मात्र, दरीत जाताना बस एका झाडाला धडकून थांबल्याने मोठा अनर्थ टळला. अन्यथा बस थेट अरुणा धरणाच्या पाण्यात जाण्याची शक्यता होती. या अपघातात चालक, वाहकांसह बसमधील १२ प्रवासी किरकोळ जखमी झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. शुक्रवारी रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास भोम-गवळवाडी नजीक अरुणा धरणाच्या रिंग रोडवर हा अपघात झाला.
कणकवली आगाराची कणकवली-मौदे वस्तीची बस चालक युवराज बंडा पाटील हे मौदे येथे घेऊन जात होते. बसमध्ये १२ प्रवासी होते. अरुणा धरणाच्या रिंग रोडवरील एका अवघड वळणावर चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल दरीत कोसळली. विशेष म्हणजे दरीत कोसळताना बस पलटी झाली नाही. खाली जात असताना एका झाडाला धडकून बस तेथेच थांबली. त्यामुळे बस धरणाच्या पाण्यात जाण्याचा धोका टळला.
अपघातानंतर वाहक व प्रवाशांनी प्रसंगावधान राखत बसचा दरवाजा उघडला आणि एकमेकांना आधार देत सुरक्षितपणे बसबाहेर पडले. या ठिकाणी मोबाईल नेटवर्क उपलब्ध नसल्याने मदतीसाठी संपर्क साधणेही शक्य नव्हते. रात्रीचा अंधार आणि दाट जंगलातून वाट काढत सर्वजण जिवाच्या आकांताने दरीतून वर रस्त्यावर आले. त्याचदरम्यान रस्त्यावरून जाणाऱ्या एका खासगी वाहनाला थांबवून सर्व प्रवासी मौदे येथे आपल्या घरी गेले.
या अपघाताची माहिती खासगी वाहनचालक आनंद जामदार यांनी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद रावराणे यांना दूरध्वनीवरून दिली. रावराणे यांनी तातडीने वैभववाडी पोलिस ठाणे तसेच एसटी विभागाला अपघाताची माहिती दिली.
माहिती मिळताच वैभववाडी पोलिस निरीक्षक मनोज सोनवलकर, पोलिस हवालदार शैलेश कांबळे, किरण मेथे, मनोज कांबळे यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मौदे येथे जाऊन जखमी प्रवाशांची विचारपूस केली. स्थानिक डॉक्टरांनी जखमींवर प्राथमिक उपचार केले. चालक युवराज पाटील आणि वाहकाला पोलिसांच्या वाहनातून वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच एसटीचे विभाग नियंत्रक श्री. घोडे, अधिकारी श्री. देशमुख, निलेश लाड, डेपो व्यवस्थापक श्रीमती जाधव, श्रीनिवास कदम, बाबू मुळदे आदी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मौदे येथे जाऊन जखमी प्रवाशांची विचारपूस केली. शनिवारी दुपारपर्यंत एसटी बस दरीतच होती. बस बाहेर काढण्यासाठी एसटी प्रशासनाकडून कार्यवाही सुरू होती.
दरम्यान, चालक युवराज पाटील यांनी मद्यप्राशन करून बस चालवल्याचा आरोप काही प्रवाशांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर वैभववाडी पोलिसांनी ग्रामीण रुग्णालयाला पत्र देऊन चालकाने मद्यप्राशन केले होते की नाही, याबाबत वैद्यकीय चाचणी करण्याची मागणी केली आहे. या चाचणीचा अहवाल आल्यानंतरच याबाबतचे वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.
याच वळणावर गेल्या वर्षीही एसटी बस रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारात कलंडून अपघात झाला होता. त्यामुळे या धोकादायक वळणावर रस्ता रुंदीकरण तसेच आवश्यक सुरक्षात्मक उपाययोजना करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.











