अमली पदार्थांविरोधात पोलिसांची धडक ; २२ संशयित अटकेत

‘मिशन फिनिक्स’अंतर्गत विशेष मोहीम ; १६ गुन्हे दाखल, २ लाख २ हजारांचा अंमली पदार्थांचा साठा जप्त

रत्नागिरी : प्रतिनिधी
जिल्ह्यात अमली पदार्थांची अवैध विक्री, साठवणूक आणि सेवन करणाऱ्यांविरोधात जिल्हा पोलीस दलाने ‘मिशन फिनिक्स’अंतर्गत धडक कारवाई केली आहे. ८ ते १४ सप्टेंबर या कालावधीत राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत एकूण १६ गुन्हे दाखल करण्यात आले असून, २२ संशयितांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत २ लाख २ हजार २०० रुपये किमतीचा अमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला.
जिल्ह्यात अमली पदार्थांची विक्री, बेकायदेशीर साठवणूक आणि सेवनाला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबविण्यात आली. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या माध्यमातून अमली पदार्थांची विक्री करणारे, बेकायदेशीररीत्या ताब्यात ठेवणारे तसेच सेवन करणाऱ्या व्यक्तींविरोधात कारवाई करण्यात आली.
या मोहिमेदरम्यान अमली पदार्थ सेवनाचे १०, तर अमली पदार्थ बाळगल्याचे सहा गुन्हे दाखल झाले. अशा एकूण १६ गुन्ह्यांमध्ये २२ संशयितांना अटक करण्यात आली.
पोलिसांनी केलेल्या कारवाईत ७७ हजार रुपये किमतीचे ५.१५ ग्रॅम ब्राऊन हेरॉईन आणि १ लाख २५ हजार २०० रुपये किमतीचा २ किलो ५११ ग्रॅम गांजा जप्त केला. या दोन्ही अमली पदार्थांची एकूण किंमत २ लाख २ हजार २०० रुपये आहे.
अमली पदार्थांची अवैध विक्री आणि तस्करी करणाऱ्यांसह त्यांचे सेवन करणाऱ्या व्यक्तींविरोधात यापुढेही कठोर आणि सातत्यपूर्ण कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा पोलीस दलाने स्पष्ट केले आहे. युवक आणि समाजाला अमली पदार्थांच्या विळख्यापासून दूर ठेवण्यासाठी ‘मिशन फिनिक्स’अंतर्गत प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि जनजागृतीपर उपक्रमही राबविण्यात येत आहेत.

नागरिकांना पोलिसांचे आवाहन
जिल्ह्यात अमली पदार्थांची विक्री, वाहतूक, साठवणूक किंवा सेवन यासंदर्भात कोणतीही माहिती मिळाल्यास नागरिकांनी ती तातडीने जवळच्या पोलीस ठाण्यात कळवावी, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने केले आहे. तसेच ‘रत्नसेतू चॅटबॉट’च्या मोबाईल क्रमांकावरही माहिती देता येणार आहे. अमली पदार्थांच्या अवैध व्यवहारांना आळा घालण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.