राजे प्रतिष्ठानतर्फे दुर्ग गोविंद गडावरील तटबंदी, बुरुज आणि सदरेचा परिसर केला स्वच्छ

चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूणचा ऐतिहासिक मानबिंदू असलेल्या गोवळकोट येथील दुर्ग गोविंदगडाच्या स्वच्छता व संवर्धन मोहिमेला राजे सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने उत्साहात प्रारंभ करण्यात आला. सन २०२६-२७ या वर्षातील मोहिमेचा शुभारंभ करताना गडावरील तटबंदी, बुरुज आणि ऐतिहासिक वास्तूंच्या परिसरातील झाडाझुडपांची स्वच्छता करण्यात आली.
दुर्ग गोविंदगडाच्या संवर्धनासाठी प्रतिष्ठान गेल्या १२ वर्षांपासून सातत्याने कार्यरत आहे. मोहिमेची सुरुवात सकाळी ७.३० वाजता गडदेवता आई रेडजाई मातेचे आणि हत्यारांचे विधिवत पूजन करून करण्यात आली. त्यानंतर प्रेरणामंत्र घेऊन प्रत्यक्ष स्वच्छता मोहिमेला सुरुवात झाली. गडाच्या आतील आणि बाहेरील भागातील बुरुज व तटबंदीच्या लगत वाढलेली काटेरी झुडपे, गवत आणि अनावश्यक वनस्पती हटविण्यात आल्या. तसेच गवताने व्यापलेला सदरेचा (सहाण) परिसर स्वच्छ करून मोकळा करण्यात आला. ऐतिहासिक वास्तूंचे जतन आणि गडाचे महत्त्व अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने हा उपक्रम राबविण्यात आला. या मोहिमेत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, छावा प्रतिष्ठान यांसह विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. राजे सामाजिक प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनीही मोठ्या उत्साहाने श्रमदान केले.
दुर्ग गोविंदगड हा चिपळूणच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक अस्मितेचा महत्त्वाचा ठेवा आहे. या वारशाचे जतन, गडाचे पावित्र्य आणि ऐतिहासिक वास्तूंचे महत्त्व नव्या पिढीपर्यंत पोहोचावे, यासाठी प्रतिष्ठानच्या वतीने स्वच्छता, संवर्धन आणि जनजागृतीचे उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत. आगामी काळातही या मोहिमेत शिवप्रेमी, दुर्गप्रेमी आणि इतिहासप्रेमींनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.