रत्नागिरी : प्रतिनिधी
रत्नागिरीतील राजीवडा येथून मच्छीमारीसाठी समुद्रात गेलेली ‘ओशियन पल’ नावाची यामा इंजिनची बोट अचानक आलेल्या लाटेमुळे उलटली. या दुर्घटनेत बोटीवरील आठही खलाशी समुद्रात पडले. मात्र, त्याच परिसरातून मच्छीमारी करून परतणाऱ्या ‘अल सुरया’ बोटीवरील खलाशांनी तत्काळ मदत करत सर्वांना सुखरूप वाचविले.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी सुमारे सहा वाजता ‘ओशियन पल’ ही बोट आठ खलाशांना घेऊन राजीवडा येथून रत्नागिरी लाईट हाऊससमोरील समुद्रात मच्छीमारीसाठी गेली होती. मच्छीमारी करून राजीवडा जेटीकडे परतत असताना सकाळी सुमारे ८.४५ वाजण्याच्या सुमारास समुद्रात अचानक मोठी लाट आली. या लाटेच्या तडाख्याने बोट पलटी झाली आणि त्यावरील सर्व खलाशी समुद्रात पडले.
यावेळी जवळून ‘अल सुरया’ नावाची बोट मच्छीमारी करून परतत होती. या बोटीवरील खलाशांनी प्रसंगावधान राखत समुद्रात पडलेल्या सर्व खलाशांना मदत केली आणि त्यांना सुखरूप बाहेर काढले. बचावकार्य करणाऱ्यांमध्ये खालीद इस्माईल होडेकर, अजमल शब्बीर हुनेरकर, कैफ खालीद होडेकर, खलील अली मजगावकर आणि यासीन महमूद पावसकर यांचा समावेश आहे. हे सर्व राजीवडा, रत्नागिरी येथील रहिवासी आहेत.
बुडालेल्या बोटीवरील खलाशांमध्ये साद सिकंदर हुसये (वय २१), मुहाफीस मुजकीर मुकादम (२२), अहमद सुलेमान सोलकर (३८), इम्तियाज मलिक मुजावर (२१), नासिर गफूर हुसये (६०), शोएब नासिर हुसये (३०), इमरान अन्वर डंगी (३५) आणि तौसीफ सुलेमान सोलकर (३५) यांचा समावेश आहे. हे सर्व राजीवडा, रत्नागिरी येथील रहिवासी आहेत.
सर्व आठ खलाशांना सुखरूप किनाऱ्यावर आणण्यात आले. त्यांची वैद्यकीय तपासणी करण्याबाबत विचारणा करण्यात आली असता, सर्वांनी कोणत्याही वैद्यकीय उपचाराची आवश्यकता नसल्याचे सांगितले. घटनेची माहिती मिळताच प्रो. थोरात, पोलीस उपअधीक्षक तथा प्रभारी अधिकारी, रत्नागिरी शहर पोलीस ठाणे तसेच पोलीस निरीक्षक श्री. पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या घटनेनंतर परिसरात शांतता असून सर्व खलाशी सुखरूप असल्याची माहिती आहे.











