५ ऑक्टोबरला आझाद मैदानावर बेमुदत धरणे; ग्रामीण शाळा वाचवण्यासाठी एकजुटीचा निर्धार
सावंतवाडी : शाळा वाचवा–शिक्षण वाचवा मंच, महाराष्ट्रच्या वतीने ५ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर होणाऱ्या बेमुदत धरणे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ले तालुक्यांची संयुक्त बैठक मळगाव हायस्कूल येथे उत्साहात पार पडली. ग्रामीण भागातील शाळा, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि नवीन शैक्षणिक धोरणामुळे निर्माण झालेल्या प्रश्नांवर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीची प्रस्तावना समीर परब यांनी केली. यावेळी कॉम्रेड संपत देसाई, शिक्षक भारतीचे राज्य कार्यवाह संजय वेतुरेकर, राजन कोरगावकर, समीर परब, अंकुश कदम, शेखर पाडगावकर, सिद्धेश तेंडोलकर, विजय राऊळ आणि बाबू गवस यांनी मार्गदर्शन करत आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली. “माझ्या गावाची मराठी शाळा ही आमची अस्मिता आहे” या भावनेतून गावोगावी शाळा वाचवण्यासाठी व्यापक जनआंदोलन उभे करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
बैठकीत शासनाकडे मांडण्यात येणाऱ्या प्रमुख मागण्यांमध्ये कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा निर्णय तातडीने मागे घेणे, प्रत्येक वर्ग व प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र शिक्षक नियुक्त करणे, गाव–तांडा–वाडी–वस्ती तेथे शाळा हे धोरण कायम ठेवणे, १५ मार्च २०२४ चा संचमान्यता शासन निर्णय रद्द करणे, उच्च शिक्षणाच्या खासगीकरणाला आळा घालणे, तसेच केजी ते पीजी सर्व विद्यार्थ्यांना मोफत, गुणवत्तापूर्ण आणि समान शिक्षण उपलब्ध करून देणे या मागण्यांचा समावेश आहे. शिक्षणावरील सरकारी खर्च राष्ट्रीय उत्पन्नाच्या किमान दहा टक्क्यांपर्यंत वाढविण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.
५ ऑक्टोबरच्या आंदोलनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक गावातून ग्रामस्थ, पालक, माजी विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, तरुण-तरुणी आणि शिक्षणप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, यासाठी गावोगावी जनजागृती बैठका घेण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेषतः मुंबईतील चाकरमान्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग निश्चित करण्यासाठी स्वतंत्र नियोजनही करण्यात आले.
ग्रामीण भागातील शाळा या केवळ शिक्षणाची केंद्रे नसून गावाच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक अस्तित्वाचा आधार आहेत. त्यामुळे शाळा वाचविण्याचा हा लढा प्रत्येक पालकाचा आणि प्रत्येक गावाचा लढा बनला पाहिजे, असा एकमुखी सूर मळगावातील बैठकीत उमटला.













