तालुक्यात आलेल्या मुंबईकर गणेशभक्तांच्या परतीच्या प्रवासाची राजापूर आगारातुन चोख व्यवस्था

रविवारी राजापूर आगारातुन सुटल्या तब्बल १४९ जादा गाडया

राजापूर प्रतिनिधी : गणेशोत्सवासाठी तालुक्यात दाखल झालेल्या मुंबईकर गणेशभक्तांच्या परतीच्या प्रवासासाठी राजापूर आगाराने चोख नियोजन करत मुंबईकर गणेशभक्तांना दिलासा दिला आहे. रविवारी एकाच दिवशी राजापूर आगारातुन मुंबई, बोरिवली, ठाणे, नालासोपारा, विठ्ठलवाडी मार्गावर तब्बल १४९ जादा गाडया सोडून मुंबईकर गणेशभक्तांचा प्रवास सुखकर केला आहे. अत्यंत चांगले नियोजन करत व वेळेत गाडया सोडत राजापूर आगाराने प्रवाशांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे.

गणेशोत्सवासाठी दरवर्षी संपुर्ण कोकणात मोठया प्रमाणावर मुंबईकर गणेशभक्त येतात, एसटी, रेल्वेसह खासगी बस व वाहनाने मोठया प्रमाणावर मुंबईकर येतात. त्यामुळे दरवर्षी परतीच्या प्रवासासाठी राजापूर आगारातुन जादा गाडयांचे नियोजन केले जाते. गौरी गणपती विसर्जनानंतर मुंबईकडे परतणाऱ्यांची संख्या मोठी असते. त्यामुळे जास्तीत जास्त जादा गाडयांचे आरक्षण केले जाते. यावर्षी शनिवारी गौरी गणपतीचे विसर्जन झाल्याने रविवारी मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी होती. अगदी ग्रुप आरक्षण पध्दतीने प्रवाशांनी गाडया आरक्षित केल्या होत्या. सोमवारी अनेकांना कामावर जावयाचे असल्याने अनेकांनी रविवारीच परतीचा निर्णय घेतला. राजापूर आगारातुन नियमित गाडयांशिवाय जादा गाडयांचेही आगाऊ आरक्षण उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला.

रविवारी राजापूर आगातुन तब्बल १४९ जादा गाडया सोडण्यात आल्या. यामध्ये मुंबई, परेल, बोरिवली, ठाणे, कल्याण, भिवंडी, भांडूप, भाईंदर, विरार, नालासोपारा, विठ्ठलवाडी अशा मार्गावर प्रवाशांच्या मागणी प्रमाणे व आगाऊ आरक्षण करून गाडया सोडण्यात आल्या. त्यामुळे मुंबईकर गणेशभक्तांना मोठा दिलासा मिळाला.

आगार प्रमुख काव्या पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली याचे अतिशय सुयोग्य असे नियोजन करण्यात आले होते. यासाठु सर्व अधिकारी, कर्मचारी, तांत्रिक कार्यशाळेतील कर्मचारी व चालक वाहकांनी मोलाचे सहकार्य केले.

२१ ते २६ या कालावधीत सुटणार ६५ जादा गाडया सुटणार

सोमवारी २१ ते शनिवार २६ सप्टेंबर या कालावधीतही मुंबईकर गणेशभक्तांसाठी राजापूर आगारातुन जादा गाडयांचे नियोजन करण्यात आलेले आहे. या कालावधीत आणखी ६५ जादा गाडया सोडण्यात येणार आहेत. २५ रोजी अनंत चतुर्दशी ला १२ दिवसांच्या गणपतींचे विसर्जन होणार असून त्या दिवशी व रविवारी २६ रोजीही जादा गाडया सुटणार आहेत.

राजापूरातील शिक्षण संस्थांचे मोलाचे सहकार्य

राजापुर आगारातुन मुंबईकर गणेशभक्तांच्या परतीच्या प्रवासासाठी रविवारी जादा गाडयांचे नियोजन करण्यात आले होते. गणेशोत्सवाच्या प्रारंभी तालुक्यात आलेल्या या जादा गाडया पार्किंग करण्यासाठी बज्मे उर्दु आदब या संस्थेने रानतळे येथील त्यांच्या संस्थेच्या इंग्रजी माध्यम प्रशाळेचे मैदान राजापूर आगाराला दिले होते. तर या जादा गाडयांवर आलेल्या चालक वाहकांना रहाण्यासाठी राजापूर शिक्षण प्रसारक मंडळाने राजापूर हायस्कुल येथे खोल्या उपलब्ध करून दिल्या होत्या. तर राजापूर नगर परिषद, व राजापूर पोलीसांनीही मोलाचे सहकार्य केले आहे. याबद्दल आगार प्रशासनाच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्यात आली आहे.